रहाटणी : देव तारी त्याला कोण मारी, याची प्रचिती मंगळवारी आली़ दुपारी एकची वेळ, शिवार चौकातील सिग्नल सुरू झाला म्हणून दुचाकीस्वाराकडून अचानक समोरचा ब्रेक लागला. अन् काही कळण्याच्या आत दुचाकी पलटी झाली. मागून येणारी वाहने प्रसंगावधान राखत जागेवर थांबली़ मात्र हेल्मेट डोक्यात होते म्हणून तो वाचला.
सुजित भंडारे (वय ३२, रा. आंबेगाव, पुणे) हा तरुण कामासाठी चाकण येथे गेला होता़ चाकणवरून परत येत असताना तो शिवार चौकातल्या शिवाजी चौकात आला. पिवळा दिवा सुरू असताना आपण जाऊ असे त्याला वाटत असतानाच लाल दिवा लागला आणि या तरुणाने मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता दुचाकीचा पुढील ब्रेक दाबला़ त्यामुळे दुचाकी जागेवरच पलटी होऊन तो सुमारे पंधरा ते वीस फूट फेकला गेला़ मात्र त्याच्या डोक्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही़ कारण त्याने हेल्मेट होते़
काही तरुणांनी व चौकात ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलीस वॉर्डन यांनी त्याला उचलून बाजूला घेतले व त्याच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला हेल्मेट होते म्हणून मी वाचलो, अन्यथा माझे काही खरे नव्हते़ हा प्रकार ह्या व्यक्ती सोबत एकदा नव्हे तर दोनदा घडलेला आहे....तर सुजित आज जिवंत राहिला नसतापिंपळे सौदागर येथील शिवार चौक नेहमीच रहदारीचा असतो. ज्या वेळेस सुजित दुचाकीवरून पडला. त्या वेळेस त्याच्यामागून अनेक वाहने वेगात येत होती. मात्र प्रसंगावधान राखत अनेक वाहनचालकांनी वाहनाच्या गतीवर ताबा मिळविला म्हणून सुजित वाचू शकला़ जर मागच्या गाड्यांचे ब्रेक लागले नसते तर सुजित आज जिवंत नसता, हे या ठिकाणी दिसून आले. त्यामुळे वाहन चालवताना नागरिकांनीदेखील वेग व मनावर ताबा ठेवण्याची अत्यंत गरज असल्याचे या घटनेवरून दिसून आले.
नागरिकांनी हेल्मेट सक्तीला विरोध करण्यापेक्षा हेल्मेटचे फायदे जाणून घ्यावेत़ जर माझ्या डोक्यात हेल्मेट नसते, तर मला प्राणाला मुकावे लागले असते.- सुजित भंडारे