गोरख माझीरे , भुगावमहामार्गावर तसेच दुर्गम ठिकाणी अपघात घडल्यास तातडीची मदत न मिळाल्याने अनेकांवर मृत्यू ओढवला आहे. भारतात अशा घटनांची संख्या जास्त आहे. अशाच एका घटनेत आपल्या भावाला गमावलेल्या एका बहिणीने अशी वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी ‘फार्इंड नीअरबाय प्लेस’ अॅप तयार करून भावाला अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. या अॅपद्वारे जवळच्या ठिकाणावरून तातडीने मदत मिळवणे शक्य होणार आहे. भुगाव येथील रहिवासी नयन चौंधे असे या तरुणीचे नाव आहे. नयन हिचा भाऊ मंदार चोंधे याचा २०१३ मध्ये पंढरपूर येथे जात असताना अपघात झाला होता. त्या वेळी जवळील हॉस्पिटल सापडत नव्हते. रात्रीची वेळ असल्याने विचारण्यासाठीही कोणीही नव्हते. तेथून त्याला ३० किमी अंतरावर एका हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु तेव्हा खूप उशीर झाला होता. वेळीच उपचार मिळाले असते तर मंदार आज आपणा सर्वांसोबत असला असता. अशी वेळ कोणावर येऊ नये, म्हणून तिने हे अॅप करायचे ठरवले. गुगल डेटाचा वापर करून तिने हे अॅप तयार केले आहे. या अॅपद्वारे आपण ज्या ठिकाणी असू त्याच्या पाच किलोमीटर परिघातील दवाखाने, हॉटेल्स, एटीएम आदी महत्त्वाची ठिकाणे, संपर्क क्रमांक तसेच त्या ठिकाणी जाण्याचा रूट मॅप असणार आहे. यामुळे तातडीची मदत मिळणे शक्य होणार आहे. हे अॅप गुगल स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येते. नयन हिने मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालयातून आपले इंजिनिअरिंग पूर्ण केले. तिचे वडील सुतारवाडी येथील खासगी केबल कंपनीत काम करतात. सध्या अनेक उत्कृष्ट अशा सॉफ्टवेअर, वेबसाईट ती घरीच तयार करीत आहे. या अॅपची आदर्श ग्रामपंचायत भुगाव यांनी दखल घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दगडूकाका करंजावणे, विद्यमान सरपंच सचिनभाऊ मिरघे, माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, ग्रा. पं. सदस्य मधुकर गावडे, दत्तात्रय करंजावणे, युवानेते अक्षय सातपुते, प्रदीप शेडगे यांनी ग्रामपंचायतीतर्फे सत्कार केला व अॅपची प्रशंसा करून नयनचे कौतुक केले.
संकटकाळात मिळणार ‘अॅप’द्वारे मदत
By admin | Published: April 18, 2017 2:53 AM