पुणे : महापालिकेकडे असलेला मिळकतकर नोंदणीचा डेटा, बांधकाम परवानग्यांची माहिती एकत्र करून सॅटेलाइट इमेजद्वारे मिळकतींचे थ्री-डी नकाशे तयार करून आर्टिफिशयल इंटेजिलन्सच्या मदतीने शहरातील मिळकती शोधून कर आकारणी न झालेल्या मिळकतींवर कर आकारणी केली जाणार आहे़
मिळकतकर आकारणी न झालेल्या मिळकती शोधण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशयल इंटेजिलन्स) याचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली़ याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे़ सदर काम करणाऱ्या कंपनीला या पध्दतीने जेवढ्या मिळकती शोधण्यात येतील, त्यावर झालेल्या कर आकारणीच्या साडेचार टक्के रूपये मोबदला शुल्क म्हणून अदा करण्यात येणार आहे़
दरम्यान, सहा वर्षांपूर्वी अशाच प्रकारे महापालिकेने मिळकती शोधण्यासाठी कंपनी नेमली होती. मात्र, त्यांचे काम चांगले नसल्याचे सांगत दोन वर्षांपूर्वी हे काम काढून घेण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबवून हे काम ‘ला मेरे बिझनेस प्रा़ लि.’ या कंपनीला २ वर्षे ३ महिनेकरिता देण्यात आले आहे़ सॅटेलाइट इमेज, त्यासाठीचे सॉफ्टवेअर आणि इतर आवश्यक सर्व खर्च संबंधित कंपनी करणार असून, त्यासाठी कोणताही खर्च महापालिकेस असणार नाही, असेही रासने यांनी सांगितले़
-----------