पुणे : राज्य सरकारच्या आरोग्य राज्यमंत्र्यांच्या एका पत्रावर महापालिका ससून रुग्णालयाला व्हेंटिलेटर घेण्यासाठी ५० लाख रुपये देणगी देणार आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत विरोधी नेत्यांचा विरोध डावलून हा निर्णय घेतला गेल्याची माहिती मिळाली. स्थायी समिती व सर्वसाधारण सभा मंजुरी देईल, असे गृहीत धरून ही देणगी देण्यात येणार आहे.महापौरांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे संजय भोसले आदी या वेळी उपस्थित होते. ससून रुग्णालयाला व्हेंटिलेटर घेण्यासाठी देणगी द्यावी, असे आरोग्य राज्यमंत्र्यांचे पत्र आले असून त्यानुसार त्यांना देणगी देण्याचा विषय चर्चेला आला. या वेळी तुपे, शिंदे यांनी महापालिकेची रुग्णालये वाऱ्यावर सोडून ससून रुग्णालयाला मदत करण्याचे कारण नाही, अशी भूमिका घेतली. मात्र, देणगी द्यावी, असा आग्रह सत्ताधारी भाजपाने धरला. यावर महापालिकेनेच व्हेंटिलेटर घ्यावेत, ते काही महिन्यांसाठी ससूनला द्यावेत व नंतर महापालिकेच्या नायडू रुग्णालयात आणावेत, असे सुचविण्यात आले किंवा नायडू रुग्णालयातच ठेवावेत व ससूनच्या डॉक्टरांना तिथे काही महिने सेवा देण्यास सांगावे, असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. देणगी देण्यास विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नकार दिला; मात्र स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळेल, असे गृहीत धरून देणगीच देण्याचे ठरविण्यात आले असल्याची माहिती मिळाली. (प्रतिनिधी)देणगी देण्यास विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नकार दिला; मात्र स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळेल, असे गृहीत धरून देणगीच देण्याचे ठरविण्यात आले असल्याची माहिती मिळाली.
ससूनला नियम डावलून मदत
By admin | Published: March 31, 2017 3:16 AM