जुन्नर : पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेचे ११ हजार रुपये अज्ञात इसमाने लांबविण्याचा प्रकार जुन्नर येथे पुणे जिल्हा बँकेच्या सराई पेठ शाखेत घडला.याबाबत घाटघर येथील अंगणवाडी सेविका कुसुम धर्माजी तळपे (वय ६५) यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या संदर्भात फिर्यादीप्रमाणे अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कुसुम तळपे पुणे जिल्हा बँकेच्या सराई पेठ शाखेत डॉ. अब्दुल कलाम अमृत योजनेचे जमा झालेले अनुदान घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी त्या खात्यातील २१,००० रुपये काढल्यानंतर पैसे मोजत असताना तेथील एका अनोळखी व्यक्तीने त्यांना ‘मी तुम्हाला पैसे मोजून देतो,’ असे सांगितले. त्यांनी त्यांच्याकडील पैसे या व्यक्तीकडे मोजण्यासाठी दिले. पैसे मोजण्याचा बहाणा करीत ‘२१,००० रुपये बरोबर आहेत,’ असे सांगून पैसे देऊन तो निघून गेला. सदर रक्कम त्या खात्यात जमा करण्यासाठी बँकेत थांबल्या. त्यातील २,००० रुपयेबाजूला काढून उरलेली १९,००० रुपयांची रक्कम स्लीप भरून बँकेच्या रोखपालाकडे दिली. या वेळी बँकेच्या रोखपालाने तळपे यांना ‘तुम्ही दिलेले पैसे फक्त ८,००० रुपये आहेत व तुम्ही १९,००० रुपयांची स्लीप भरून दिली आहे,’ असे त्यांना सांगितले.या वेळी तळपे यांनी पैसे मोजले असता ते ८,००० रुपये भरले. त्या वेळी ११,००० रुपये लांबविले गेल्याचे त्यांच्या ध्यानात आले. अनोळखी व्यक्तीकडे पैसे मोजण्यास देऊ नयेत, तसेच बँकेने ग्राहक नसलेल्या व्यक्तीला प्रवेश देऊ नये. बँकेत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा कॅमेऱ्यात स्पष्ट येईल, अशी कॅमेराची जागा असावी. तरुणांकडे आर्थिक व्यवहार सोपवावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी केले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
पैसे मोजण्याच्या बहाण्याने ११ हजार लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 2:03 AM