- मिलिंद संधान
पिंपळे गुरव (पुणे) : दापोडीतील जन्मापासूनच दिव्यांग असलेला सुहेल अन्सारी या मुस्लीम युवकाचे त्याच्यासारख्याच मोसीना या युवतीशी लग्न ठरले. पदवीधर असलेला सोहेल एका खासगी कंपनीत जेमतेम पगारावर काम करत होता; परंतु, आधीच मातृछत्र हरवलेल्या सुहेलच्या वडिलांचाही अचानक मृत्यू झाल्याने तो पुरता हतबल झाला. पदविका धारण केलेल्या; परंतु, पैशाअभावी शिक्षण थांबलेल्या आपल्या धाकट्या बहिणीसह राहत असलेल्या सुहेलसमोर समस्यांचा डोंगर आ वासून उभा राहिला; पण म्हणतात ना जिसका कोई नही है... उसका तो खुदा है यारो... या अमिताभ बच्चन यांच्या लावारिस सिनेमातल्या गाण्याप्रमाणे पन्नास वर्षांपासून त्याचे शेजारी असलेले कणसे कुटुंबीय त्यांच्या मदतीला धावले. त्यांनी त्याला धीर देत मोठ्या थाटामाटात त्याचे लग्न लावून हिंदू- मुस्लीम भाईचाऱ्याचा संदेश त्यांनी दिला.
दापोडी येथे लक्ष्मी गुलाब कणसे यांच्या शेजारी अन्सारी कुटुंबीय मागील पन्नास वर्षांपासून राहत आहेत. त्यामुळे साहजिकच दोन्ही कुटुंबाचे परस्पर जिव्हाळ्याचे संबंध वर्षानुवर्षे राहिले. सुहेल जन्मापासूनच दिव्यांग असल्याने त्याच्यावर काही शस्त्रक्रियाही झाल्या; परंतु, त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळे सुहेलच्या या सर्व गोष्टी कणसे कुटुंबीयांनी जवळून पाहिल्या हाेत्या. त्यामुळेच लक्ष्मी ताईंचा चिरंजीव संजय कणसे, अजय दूधभाते आणि सागर फुगे यांनी पुढाकार घेत सुहेलचा लग्नाचा भार उचलला आणि मोठ्या थाटामाटात आयोजन केले.
दीड वर्षांपूर्वी सुहेलची आई शाहीन यांचे निधन झाले. तर पाच महिन्यांपूर्वी त्याचे वडील रईस हेही गेले. लहानपणापासून मी सुहेलला खेळवले आहे. त्याच्या यातना मी पाहिल्यात. आमच्या श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठात हे अन्सारी कुटुंबीय दत्त जयंती, गुरूपौर्णिमेला महाप्रसादाचे वाटप, मंदिर सजावट, स्वच्छता वा दैनंदिन पूजाअर्चात ते मदत करायचे.
- लक्ष्मी गुलाब कणसे.