बारामती/पुणे : त्रिपुरा येथे झालेल्या जातिय दंगलीचे पडसाद राज्यातील काही शहरांमध्ये उमटले. मात्र अशा वेळी संयम ठेवून जातीय सलोखा वाढवला पाहिजे. दंगलीमुळे सर्वसामान्य गरिब लोकांना फटका बसतो. काही लोकं भावना भडकावण्याचा प्रयत्न करत असतील. तर पोलीस दलाला मदत करून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन देखील यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. घाडगेवाडी (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमामध्ये रविवारी (दि. १४ ) उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. याप्रसंगी त्यांनी सकाळी लवकर उठून काम करण्याबाबत बारामतीकरांना चिमटा काढला.
पवार म्हणाले, सकाळी लवकर कामाला सुरूवात केली. तर कामे लवकर होतात. गर्दी होत नाही. मात्र आम्ही दहा वाजता गेलो तर माणसं बाजूला करायला वेळ लागतो. मात्र काहीजण दादा सेल्फी, दादा फोटो त्यांना नाही म्हणावं तर काय ताठलाय आता. उपमुख्यमंत्री झाला साधा सेल्फी काढून देईना. ह्याची बटनं दाबू दाबू आम्ही मेलो इतके दिवस. असं म्हंटलं जातं. त्यामुळे कुठं काय करता म्हणून आपलं गप्प बसायचं. अन् पहाटे जेवढं काही उरकता येईल तेवढं उरकून घ्यायचा प्रयत्न करायचा.
''यावेळी सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांच्याकडे निर्देश करत पवार म्हणाले, हा सदगृहस्त मला पहाटे ५ वाजून ४० मिनीटांनी भेटायला आला. म्हणजे तो एक-दोन तास आधी उठला असेल. सकाळी लवकर कामाला सुरूवात करणे चांगले असते. आता आमचे बाळासाहेब किती वाजता उठतात ते सुद्धा मी पाहणार आहे. अशी टिपण्णी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्यावर करताना कार्यक्रमस्थळी खसखस पिकली.''
रस्त्याची क्वालिटी नीट नसेल तर रस्त्यावर आडवं पडून रस्ता बंद पाडायचा
दरम्यान पवार यांचे भाषण सुरू असताना येथील ग्रामस्थाने नीरा-बारामती रस्ता पूर्णपणे खचला आहे. जागोजागी खड्डे आहेत, अशी तक्रार पवार यांच्याकडे केली. यावर पवार म्हणाले, आता एकच सांगतो येथून पुढे कोणत्याही रस्त्याचे काम सुरू असले आणि त्याची क्वालिटी नीट नसेल तर रस्त्यावर आडवं पडून रस्ता बंद पाडायचा. तुम्ही रस्त्याचे काम आडवलं तर मला येथील बांधकाम अधिकारी सांगतील, दादा येथे रस्त्याचे काम अडवलं आहे. त्यावेळी मी सुद्धा आमच्या कार्यकर्त्याने काम अडवलं असेल तर तिथे काहीतरी चुकीचे काम सुरू आहे. ते सुधारा अशा सुचना मला करता येतील. मी तुम्हाला हात जोडून सांगतो. आपण आपल्या रस्त्याची व विकास कामांची गुणवत्ता चांगली ठेऊ.