पुणे : बेंगळूरुमधील नोकरी गेलेली, पुण्यात मुलाखतीच्या आशेने ती आलेली, पण मुलाखतीला अजून आठवडा बाकी होता. परक्या शहरात राहायची सोय नाही, हातात फक्त १०० रुपये, अशावेळी बावरलेल्या या तरुणीने एक चांगला निर्णय घेतला. तिने सरळ पोलीस ठाण्याचा रस्ता निवडला. तिची हकिकत जाणून येरवडा पोलिसांनी तिला मदत केलीच त्याचवेळी कोथरुड पोलिसांनी तिची राहण्याची व्यवस्था केली.२४ वर्षांची ही तरुणी मुळची कोलकत्ता येथील राहणारी, बी़ एस्सी, फिजिक्सपर्यंत शिक्षण झालेली़ आॅक्टोंबर २०१९ पासून बेंगळूरु येथील एका कंपनीत नोकरी करीत होती. लॉकडाऊनमुळे तिची नोकरी गेली. तिने हिंजवडी येथील टेक महिंद्रा येथे ऑनलाईन अर्ज केला. २९ जून रोजी तिच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठरला आहे. त्यासाठी ती तिथून थेट पुण्यात आली. परंतु, प्रवास व लॉकडाऊनमधील खचार्मुळे तिच्याकडे केवळ १०० रुपये उरले होते. पुणे स्टेशनला आल्यावर तिच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला.पुण्यात कोणीही ओळखीचे नाही.शेवटी तिने पेईंग गेस्ट म्हणून राहण्याच्या दृष्टीने रुम शोधण्याचा प्रयत्न केला. पण होम क्वारंटाईन शिक्क्यामुळे तिला कोणीच ठेवून घेतले नाही. १८ जून रोजी ती येरवडा पोलीस ठाण्यात पोहचली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांनी तिची विचारपूस केल्यावर तिने आपली सर्व हकीकत सांगून आपली असहाय्यता व्यक्त केली. तिची अडचण लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम व महिला कर्मचार्यांना बोलावून घेऊन तिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या विश्रांती कक्षात राहण्याची व्यवस्था केली. तिच्यासोबत महिला कर्मचारी राजे व रासकर यांना ठेवण्यात आले. १९ जून रोजी तिची नास्ता, जेवणाची व्यवस्था केली. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी वर्गणी काढून तिला राहण्यासाठी व स्वखर्चासाठी पुरेशी रक्कम गोळा केली. तिच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना कोथरुड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दशभुजा गणपती मंदिराजवळ एका ठिकाणी तिची राहण्याची सोय केली. तिला महिला कर्मचार्यांनी सुरक्षितरित्या त्या ठिकाणी पोहचविण्यात आले. नव्या शहरात आलेल्या, कोणतीही ओळख पाळख नसता ही तरुणी कळत नकळत कोणाचेही सावज बनू शकली असती. वेळीच तिने पोलिसांकडे सहाय्य मागितल्याने आज तिचे जीवन किमान सुरक्षित झाले आहे.