लासुर्णे - कोणत्याही क्षेत्रामध्ये मग ते क्रीडा असो वा इतर ज्या व्यक्तीने स्वमेहनतीने देशासाठी उल्लेखनीय काम केल्यावर शासनासह अनेकांकडून विविध प्रकारच्या मदतीचा व कौतुकाचा वर्षाव होतो, ही चांगली बाब आहे. एखाद्या खेळाडूकडे खूप चिकाटी असूनही योग्य मार्गदर्शन व आर्थिक बळ मिळत नसल्यामुळे हे खेळाडू ध्येयापर्यंत पोहोचत नाहीत. मदत व मार्गदर्शन असा संघर्ष सुरू असताना मदत मिळावी, अशी अपेक्षा राष्ट्रकुल स्पर्धेमधील सुवर्णपदकविजेता मल्ल राहुल आवारे यांनी केली.कळंब (ता. इंदापूर) येथील फडतरे उद्योगसमूह व फडतरे पब्लिक ट्रस्टच्या वतीने सुवर्णपदकविजेता मल्ल राहुल आवारेचा एक लाख रुपयांचा धनादेश देऊन विशेष सत्कार करण्यात आला. राहुल म्हणाला, ‘‘लाल मातीमधील कुस्त्या ही महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आहे, ती जपली गेली पाहिजे. परंतु मॅटवरील कुस्त्या ही काळाची गरज असून आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्त्यांना विशेष महत्त्व आहे.’’ भविष्यकाळामध्ये आॅलिंपिक व एशियन गेम्स स्पर्धा हे आपले ध्येय असून त्यादृष्टीने कठोर परिश्रम घेऊन सुवर्णपदक पटकावणारच, असा विश्वास राहुल आवारे याने व्यक्त केला.याप्रसंगी उत्तम फडतरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय फडतरे, मंगेश फडतरे, मल्लसम्राट रावसाहेब मगर, कळंबच्या सरपंच उज्ज्वला फडतरे, पंचायत समिती सदस्या शैलजा फडतरे, प्राचार्य संदीप पानसरे, प्रा. गवळी, अनिल तांबे, सुभाष जाधव, भारत रणमोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संघर्षाच्या काळात मदत अत्यंत महत्त्वाची - राहुल आवारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 2:50 AM