पुणे : आपण आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगत असताना, दुसऱ्यांसाठी देखील काय करता येईल, याचा विचार करायला हवा. अनेक लोक पैशांच्या मागे पळत असतात. परंतु मालन वणवे आणि कुटुंबीयांनी कोरोनाग्रस्तांसाठी केलेली मदत मोठी आहे. भाजी विकून कोरोना रुग्णांसाठी मदत करायला मोठे मन लागते. गरजूंना मदत करणे हा या कुटुंबाचा चांगला विचार आहे. मला काय मिळणार, हा विचार सोडून दुसऱ्यांना काय देता येईल हा विचार करा, हेच श्री सद्गुरू शंकर महाराज यांनी सांगितले आहे, असे मत खासदार गिरीश बापट यांनी केले.
चरण वणवे लिखित ‘अनुभूती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठाच्या प्रवेशद्वारासमोर केले होते. गिरीश बापट, डॉ. योगेश पंचवाघ व साहित्यिक गोपाळ कांबळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन केले. या वेळी नगरसेविका मानसी देशपांडे, राजेंद्र शिळीमकर, सचिन जामगे, चरण वणवे उपस्थित होते.
चरण वणवे, किरण वणवे व त्यांच्या आई मालन वणवे हे रस्त्यावर भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. मालन या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्याचा आयुष्याचा लढा सुरु असून त्वरित या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे ही त्यांची इच्छा असल्याने मठाच्या बाहेर पुस्तकाचे प्रकाशन केले. चरण यांना आलेली शंकर महाराजांची प्रचिती, अनुभव व आईच्या कष्टांचे चीज या पुस्तकात मांडले आहे. पुस्तकाच्या विक्रीतून येणारे सर्व पैसे सोलापूर येथील शुभराय महाराज मठ अनाथ आश्रम येथे देणार आहे.