पुणे : जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशदवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशिधरन नायर शहीद झाले. त्यांच्या कुटुंबीयांना पुण्यातील नवचैतन्य हास्ययोग परिवार व इतर संस्थांच्यावतीने ‘जरा याद करो कुर्बानी’ या कार्यक्रमांतर्गत एक लाख बावन्न हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठेतील पत्रकार भवन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती परिवारचे अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी दिली.
या कार्यक्रमाला एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त), उद्योजक प्रकाश धोका हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शहीद मेजर शशिधरन नायर यांच्या वीरपत्नी तृप्ती नायर यांना नवचैतन्य हास्ययोग परिवार, चंद्रप्रकाश फाऊंडेशन, पुनावाला गार्डन, सॅलिस्बरी पार्क शाखेच्यावतीने आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. यावेळी पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यात येणार आहे.