लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/हिंजवडी : कोरोना काळात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नेमून दिलेले सर्वेक्षण तसेच कोरोनाबाधितांची माहिती गोळा करत माण येथील आशासेविका मंगल बलकवडे यांना कोरोनाने ग्रासले. कोरोनाशी लढताना त्यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या या बलिदानाची केंद्राने दखल घेतली असून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान गरीब कल्याण विमा योजनेंअंतर्गत त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. जिल्ह्यातील अशा प्रकारची मदत मिळालेले बलकवडे हे पहिलेच कुटुंबीय ठरले आहे.
आयटीनगरी माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून मंगल बनसोडे कार्यरत होत्या. त्या माण येथील बोडकेवाडी येथे वास्तव्यास होत्या. माण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी काम करत होत्या. कोरोना महामारीच्या अगदी सुरुवातीपासून कोरोनाबाधित रुग्णांना धीर देणे, नजिकच्या आरोग्य केंद्रात पाठवणे, रुग्णवाहिका आणि बेड मिळवून देणे, घरोघरी जाऊन ग्रामस्थांचे सर्व्हेक्षण करून संशयित कोरोना रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांची माहिती घेणे, सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे गृहविलगीकरण करणे आदी कामात त्या महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. माण प्राथमिक आरोग्य केंद्रात आपले कर्तव्य बजावत असतानाच त्या कोरोनाबाधित झाल्या होत्या. मात्र, कोरोनाशी लढताना त्यांचे ६ सप्टेंबर २०२० ला निधन झाले. कोरोना लढ्यात त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता चांगली सेवा बजावली.
दरम्यान, त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत फ्रंटलाईन वर्कर्ससाठी असलेल्या नियोजित विम्याची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मिळावी यासाठी माण ग्रामपंचायत आग्रही होती. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने, पंचायत समिती मुळशीच्या माध्यमातून जिल्हा परिषदकडे पाठपुरावा केला होता. अखेर बलकवडे यांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम मिळाली, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले. ----
चौकट
पुणे जिल्ह्यात ४१ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू
जिल्हा परिषदेच्या १ ग हार २४१ कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाने ग्रासले आहे. तर १ हजार १८७ जण कोरोनातून बरे झाले आहे. या पैकी ४१ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांना विम्याची रक्कम देण्यासाठी प्रशासनातर्फे सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे. लवकरच केंद्राकडे त्यांचे प्रस्ताव पाठवले जाणार असून त्यांनाही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत विमा योजने अंतर्गत मदत मिळवून दिली जाणार आहे.
चौकट
प्राथमिक आरोग्य माण बोडकेवाडी येथे मंगल बलकवडे या २००८ पासून आशासेविका या पदावर मानधनावर कार्यरत होत्या. त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, सुशील आणि प्रामाणिक होता. नेहमी हसतमुखाने न कंटाळता समाजात तळागळातील लोकांना आरोग्य सेवा मनोभावे देऊन त्या सामाजिक बांधिलकी जपत होत्या. मार्च २०२० पासून कोरोना विषाणूजन्य आजाराने थैमान घातले होते. तेव्हा त्यांनी स्वत: जीवाची पर्वा न करता रात्र दिवस कोरोना रुग्णांची काळजी घेणे, धीर देत रुग्णालयात पाठविणे, तसेच त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, सर्व्हेक्षण करून संशयित रुग्णांचा शोध घेऊन खऱ्या अर्थाने त्या कोरोना योद्धा म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या या कार्याचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले आहे.