भोसरी : अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. महापुराने उद्ध्वस्त झालेल्या केरळला देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनीदेखील केरळमधील बांधवांना मदतीचा हात दिला आहे. लांडगे यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी दोन टन कांदा पाठविला आहे. पिंपरीतील चर्च आॅफ गॉड यांच्याकडे हा कांदा सुपूर्त केला. या चर्चने हा कांदा केरळकडे पाठविला आहे. केरळातील अलेप्पी, चेंगणूर, पतनमतीट्टा या जिल्ह्यातील नागरिकांना हा कांदा देण्यात येणार आहे.
आमदार लांडगे म्हणाले, ‘‘देवभूमी असलेल्या केरळचे महापुराने न भुतो भविष्य असे नुकसान झाले आहे. संपूर्ण राज्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून, केरळ राज्याला यातून बाहेर येण्यासाठी मदतीची गरज आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जनजीवन सुरळीत येण्यास सुरुवात झाली आहे. केरळ पूरग्रस्तांना मदतीची मोठी गरज आहे. राज्य सरकारनेदेखील त्यांना मदत केली आहे. तसेच नगरसेवकांनीदेखील एक महिन्याचे मानधन देऊन मदत केली आहे. त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून प्रत्येकाने आपआपल्या परीने आपल्या केरळातील बांधवांना मदत करावी.’’सांगवी : पिंपळे निलख येथील विशाल नगरमधील हिंद मित्र मंडळ सेवा ट्रस्टतर्फे केरळमधील पूरग्रस्तांना सात हजारांचा साहाय्यता निधी देण्यात आला. लायन्स क्लब रहाटणीकडे निधी सुपूर्द करण्यात आला. क्लबचे अध्यक्ष अशोक बनसोडे, आनंदराव दौंडकर, संदीप बोडके, अविनाश दौंडकर, ईश्वर पाटील, बाळासाहेब कांबळे, विजय चांदगुडे, उमाकांत ठाकरे, अरविंद पाटील, पुंडलिक देवकर, चंद्रकांत दरेकर उपस्थित होते.जाधववाडीत प्रार्थनाजाधववाडी : चिखली येथील शाही जामा मशिदीत बकरी ईदनिमित्त नमाजपठण करण्यात आले. मौलाना अबरार अहेमद यांनी नमाजपठण केले. विश्वशांती आणि केरळ येथील पूरग्रस्तांसाठीही या वेळी प्रार्थना करण्यात आली. सुमारे साडेतीनशे वर्षांची परंपरा या मशिदीला असल्याचे फिरोज शेख यांनी सांगितले.