पुणे : रुग्णांना घरी वैद्यकीय सेवा मिळावी आणि गरजूंना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संचेती हेल्थकेअर अॅकॅडमी, संचेती हॉस्पिटल, गॅलट्री मेडिकल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने ‘घरगुती आरोग्य सहायक’ हा अल्पकालीन अभ्यासक्रम सुरू केला जात असल्याचे घोषणा माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी बुधवारी केली.घरी एकट्या राहणाऱ्या वृद्ध व अपंग रुग्णांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे संचेती रुग्णालयाने यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा प्रतिभाताई पाटील यांनी ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांच्याकडे व्यक्त केली होती. त्यानुसार संचेती रुग्णालयातर्फे येत्या १ मे पासून सहा महिने कालावधीचा ‘घरगुती आरोग्य सहायक’ हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. संचेती हॉस्पिटलतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत प्रतिभाताई पाटील यांनी अभ्यासक्रम सुरू करण्यामागची भूमिका सांगितली. याप्रसंगी डॉ. के. एच. संचेती, शामला देसाई, मनीषा संघवी आदी उपस्थित होते.डॉ. संचेती म्हणाले, इयत्ता ८ वी ते १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि आजारी, अपंग व्यक्तींना मदत करण्याची इच्छा असलेल्या मुला-मुलींना या अभ्यासक्रमास प्रवेश दिला जाईल. प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांची किमान वयोमर्यादा १७ वर्षे व कमाल ३० वर्षे असावी. प्रथम येणाऱ्या ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. एका महिन्याला प्रत्येकी १ हजार रुपये असे पूर्ण अभ्यासक्रमासाठी ६ हजार रुपये शुल्क आकारले जाईल. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना संचेती हेल्थकेअर अॅकॅडमीतर्फे प्रमाणपत्र दिले जाईल. मुलगा व सून दोघेही नोकरी करतात. त्यामुळे घरी आजारी असलेल्या ज्येष्ठ आई-वडिलांची किंवा लहान मुलांनाची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय माहिती असणाऱ्या व्यक्तीची गरज असते. सर्वांगीण विचार करून रुग्णालयातर्फे हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे गरजूंना रोजगार आणि रुग्णांना काळजी घेणारे कुशल व्यक्ती मिळतील, असेही संचेती म्हणाले.
घरगुती रुग्णांना मिळणार साह्य
By admin | Published: February 16, 2017 3:20 AM