शिरूर : वडिलांच्या दशक्रियेनिमित्त त्यांच्या वयाइतकी रक्कम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून देऊन येथील युवा उद्योजक दत्तात्रय शेलार यांनी शहिदांबरोबरच वडिलांनाही खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली.
शेलार यांचे वडिल आबू शेलार यांचे वयाचे ९२ व्या वर्षी निधन झाले. शेलार यांच्या बेलवंडी (ता. श्रीगोंदा) या मूळगावी २० फेब्रवारीला त्यांच्या वडिलांचा दशक्रिया विधी पार पडला. या दरम्यान १४ फेबुवारीला पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले. यात महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश आहे. या घटनेने अवघा भारत हळहळला. शेलार यांनीही याबाबत हळहळ व्यक्त करताना वडिलांच्या दशक्रियेनिमित्त त्यांच्या वया इतकी रक्कम (९२ हजार) महाराष्ट्रातील शहिदांच्या कुटुबांना मदत म्हणून देण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. या निर्णयानुसार शेलार यांनी चोरपांग्रा, (ता. लोणार, जि. बुलडाणा) येथे जाऊन शहीद नितीन शिवाजी राठोड यांच्या कुटुंबीयांची भेट घेवून निधी प्रदान केला.