पुणे : सध्या पुण्यामध्ये अफगाणिस्तानमधील सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अफगाणास्तानीत आणीबाणीच्या परिस्थितीमुळे त्यांच्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. या परिस्थितीत माणुसकीच्या नात्याने त्यांना मदतीचा हात देणे, हे आपले कर्तव्य आहे. याच उद्देशाने सरहद संस्थेतर्फे हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. पुणे आणि महाराष्ट्रातील अफगाणी विद्यार्थी, तसेच नागरिकांसाठी आर्थिक, मानसिक अडणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी अफगाणिस्तानातील स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही सुरु करण्यात आला आहे.अफगाणिस्तानातून विद्यार्थी शिक्षणासाठी अनेक वर्षांपासून भारतात येत आहेत. अफगाणिस्तान तालिबानच्या अधिपत्याखाली जात असताना तेथील सामान्य माणसांचे जगणे खडतर झाले आहे. येथील विद्यार्थ्यांपैकी अनेकांचा कुटुंबियांशी संपर्क तुटला आहे. काहींना आर्थिक अडचण, तर काहींना वैयक्तिक स्तरावर अनेक समस्यांना सामना करावा लागत आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून सरहद संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई आणि दिल्लीतील दुतावासांशी संपर्क साधण्यात आला आहे.सरहदचे संस्थापक संजय नहार म्हणाले, ‘अफगाणिस्तानात अचानक राजकीय उलथापालथी झाल्याने परदेशात शिकणा-या अफगाणी विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. पुणे आणि महाराष्ट्रात राहणा-या अशा विद्यार्थी आणि नागरिकांना हेल्पलाईनच्या रूपात मदत करण्यासाठी आम्ही हात पुढे केले आहेत. पुण्यातील अफगाणिस्तानचे विद्यार्थ्यांवर मानसिक आघातातून झाला आहे. त्यांना पालक आणि नातेवाईकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाटत आहे. बदललेल्या परिस्थितीमुळे त्यांचे शिक्षण आणि भविष्यातील योजना देखील बाधित होऊ शकतात. सरहदने अशा विद्यार्थ्यांना आणि अफगाणिस्तानातील इतर लोकांना मदत करण्याचे ठरवले आहे.’सरहद त्यांचे शिक्षण विनाअडथळा चालू ठेवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याचा प्रयत्न करेल आणि केंद्र सरकारच्या मदतीने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधेल. जेथे आवश्यक असेल तेथे प्रख्यात मानसशास्त्रज्ञांचीही मदत घेतली जाईल. सरहद गरजू अफगाणी विद्यार्थ्यांना नोक-या देण्याचा प्रयत्न करेल. सरहद २०१२ पासून अफगाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबींमध्ये सक्रियपणे मदत करत आहे. अफगाणी विद्यार्थी आणि सध्या महाराष्ट्रात राहणा-या नागरिकांनी ८००७०६६९०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुण्यातील अफगाणी नागरिक,विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन; सरहदचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 9:11 PM
सध्या पुण्यामध्ये अफगाणिस्तानमधील सुमारे ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
ठळक मुद्देअफगाणिस्तानातील स्वयंसेवी संस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न