पुणे : राजीव गांधी यांनी नेहमी दोन विचार असावेत, या भूमिकेला प्रोत्साहन दिले. त्यांच्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका करणारे सध्याचे दोन नटसम्राट, बनिया केवळ द्वेषाचे राजकारण करीत आहेत अशा शब्दात राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी आपले विचार मांडले. पुण्यात त्यांचे 'राजीव गांधी - जोखीम घेणारा पंतप्रधान' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी बोलताना त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.
राजीव गांधी स्मारक समिती, मिशन राजीव, पुणे शहर काँग्रेस व गोपाळतिवारी मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा व व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य बाळासाहेब थोरात या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
देसाई म्हणाले की, "सध्याचे सरकार लोकशाही संकुचित करत आहे.मतांचे ध्रुवीकरण आणि सौदे करण्यासाठी कोणत्याही अविवेकी भूमिकेतून काम करण्यावर त्यांचा भर आहे. राजीव गांधींनी ३० वर्षांपूर्वी जे काम करून ठेवले त्याची फळे आपण आज चाखत आहोत. पारदर्शक म्हणजे नेमके काय याचे उदाहरण त्यांनी घालून दिले होते. शेजारील देशांशी आणि देशातील राज्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात त्यांची भूमिका मोलाची होती. शपथ घेतल्यानंतर पहिल्या वर्षात त्यांनी धडाधड घेतलेल्या निर्णयांमुळे देश प्रगतीपथावर नेला. आज काही लोक काँग्रेस संपवण्याची भाषा करताहेत. मात्र, काँग्रेस हा विचार असून, तो कधीही संपणार नाही."
बाळासाहेब थोरात म्हणाले, "देशाला तंत्रज्ञान देण्यात राजीवजींचे योगदान मोठे आहे.आजच्या द्वेषाच्या राजकारणात लोकशाही पुढे न्यायची असेल आणि देशाचा विकास व्हायचा असेल, तर राजीव गांधी यांच्या विचारांवर आपण चालले पाहिजे. त्यासाठी त्यांच्या कार्याचा, विचारांचा प्रचार व प्रसार आपण करायला हवा."