पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत संपल्याने मंगळवारी ( दि. १६) नव्या ८ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यासह भाजपच्या सहा सदस्यांची व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांची नियुक्ती जाहीर झाली. मात्र या निवडीवरून राजकीय संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. शिवसेना सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. आरपीआयला या स्थायी समितीच्या निवडीत संधीच दिली गेलेली नाही. तसेच सत्ताधारी भाजपमध्ये देखील स्थायी समितीच्या निवडीवरून काही जणांची नाराजी असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, स्थायीत नाराजी नाट्य सुरु असले तरी शिक्षण मंडळ अध्यक्षपदी कोथरुडच्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांची वर्णी लागणार आहे.
भाजपने रासने वगळता अन्य पक्षातून भाजपमध्ये आलेल्या सदस्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी दिली आहे. भाजपच्या नवनियुक्त सदस्यांमध्ये राहुल भंडारे, मनीषा कदम, महेश वाबळे, राजाभाऊ लायगुडे, अर्चना पाटील यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनिल ऊर्फ बंडू गायकवाड, प्रदिप गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये स्थायी समितीच्या विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांची पुन्हा स्थायी समितीवर वर्णी लागली आहे.
......................
शिक्षण समितीवर तेरा सदस्यांची नियुक्ती
पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर मोठ्या प्रतीक्षेनंतर स्थापन झालेल्या शिक्षण समितीवर मंगळवारी पक्षाच्या सदस्य संख्येनुसार १३ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. महापालिकेची शिक्षण समिती स्थापन झाली असली तरी, या समितीला कोणतेही आर्थिक बाबतीत अधिकार देण्यात आलेले नाहीत. शिक्षण विभागविषयी कोणताही निर्णय घेतला तरी, त्याच्या आर्थिक तरतुदीकरिता या समितीला स्थायी समितीच्या मान्यतेची आवश्यकता राहणार आहे. पुणे महापालिकेची मुख्य सर्वसाधारण सभा आज ऑनलाइन पार पडली. या सभेत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यात भाजपच्या सदस्य संख्येनुसार शिक्षण समितीवरही भाजपाचा वरचष्मा राहिला आहे. भाजपाकडून मंजुश्री खर्डेकर, कालिंदा पुंडे, राजश्री काळे, मुक्ता जगताप, मारूती तुपे, अल्पना वर्पे व वर्षा साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बाबुराव चांदेरे, सुभाष जगताप, लता धायरकर, सुमन पठारे यांची व काँग्रेसकडून अविनाश बागवे तर शिवसेनेकडून प्राची आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------------------------------------------
समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांना गाडी नव्याने स्थापन झालेल्या शिक्षण समितीला कोणतेही आर्थिक अधिकार नसले तरी, या समितीचे कार्यालय शिक्षण मंडळाच्या कार्यालयात स्वतंत्ररित्या उभारण्यात येणार आहे. तसेच समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना शिक्षण मंडळाकडून चारचाकी वाहन देण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण समिती सदस्य नियुक्ती च्या प्रस्तावाच्यावेळी उपसूचना देण्यात आली. त्यासही सभेत मान्यता देण्यात आली.