पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. तब्बल ३० वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने सत्ता मिळवून इतिहास घडवला. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव केला. धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने सर्वत्र जल्लोषही केला. रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यावर हेमंत रासने यांनी रवीभाऊ देवेंद्रजींविषयी बोलताना तारतम्य बाळगा असा सल्ला ट्विटच्या माध्यमातून दिला होता. यावर धंगेकर यांनी प्रत्युत्तर देत रासनेंनी स्वतःचा कार्यकाळ तपासून घ्यावा असा टोला लगावला आहे.
लोकशाहीची हत्या कशी करतात ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं. देवेंद्र यांचं मत दुश्मनीच आहे. कालांतराने त्याचा यांना पश्चताप होणार आहे, दबावाचे राजकारण सुरु आहे. या आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. असं धंगेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. त्याला हेमंत रासनेंनी ट्विटच्या माध्यमातून सल्ला दिला होता. त्याला आता धंगेकरांनी उत्तर दिले आहे.
धंगेकर म्हणाले, मी फडणवीसांना काहीच बोललो नाही. मी काही एवढा मोठा नाही पण फक्त एक कार्यकर्ता म्हणून विनंती केली. हेमंत रासने मोठा माणूस आहे, त्याच्याबद्दल काय बोलणार. मात्र, मी देखील पाचवेळा महापालिकेत निवडून आलोय. तीन विधानसभा निवडणूका लढवल्यात. त्यामुळे रासनेंपेक्षा माझा कार्यकाळ मोठा आहे. रासने यांनी एकदा तो तपासून घ्यावा.
रासने नेमकं काय म्हणाले होते?
रवीभाऊ, आपण विजयी झालात, त्याबद्दल आपले अभिनंदन आहेच. आपण मा. देवेंद्रजींविषयी केलेले वक्तव्य वाचनात आले. आपण ज्या विधानभवनात पाऊल ठेवणार आहात, त्या विधानभवनाचे पर्यायाने या महाराष्ट्राचे नेतृत्व फडणवीस यांनी सलग पाच वर्षे केले आहे. त्यामुळे त्यांच्या विषयी बोलताना तारतम्य बाळगा. देवेंद्रजींच्या कारकीर्दीवर बोलावे इतके मोठे आपण नक्कीच नाहीत. कसब्याच्या जनतेने ज्यासाठी आपल्याला निवडून दिलंय, त्या जबाबदारीचे भान ठेवा. बाकी राजकारण करायला खूप विषय आहेत.