पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासने यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 01:32 PM2019-12-13T13:32:44+5:302019-12-13T13:33:01+5:30
समितीतील भाजपचे संख्याबळ लक्षात घेता, रासने यांची निवड अपेक्षितच
पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी नगरसेवक हेमंत रासने यांची शुक्रवारी निवड झाली. समितीतील भाजपचे संख्याबळ लक्षात घेता, रासने यांची निवड अपेक्षितच होती. आज निवडणूक प्रक्रियेअंती ही औपचारिकता पार पडली.
महापालिकेच्या जुन्या सभागृहात या अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून 'पीएमपीएमएल'च्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी काम पाहिले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धिरज घाटे, आमदार सुनील कांबळे, काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसचिव सुनील पारखी यावेळी उपस्थित होते.
निवडणूक अधिकारी यांच्याकडून प्रारंभी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटांची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर उभे राहून, हात वर करून, प्रभागाचे नाव सांगून सदस्यांचे मतदान घेण्यात आले.
प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस - शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक कांबळे यांना मतदान करण्यासाठी नाव पुकारण्यात आले. महेंद्र पठारे, अशोक कांबळे, वैशाली मराठे, विशाल धनवडे, स्मिता कोंढरे या 6 सदस्यांनी मतदान झाले. नंतर हेमंत रासने यांना मतदान करण्यासाठी नाव पुकारण्यात आले. दीपक पोटे, दिलीप वेडे पाटील, उमेश गायकवाड, हेमंत रासने, राजेंद्र शिळीमकर, रंजना टिळेकर, हिमाली कांबळे, सुनील कांबळे, प्रकाश ढोरे व योगेश मुळीक या 10 सदस्यांनी मतदान केले. दोन्ही मतदान अंती 10 विरुद्ध 6 या फरकाने रासने विजयी झाल्याचे नयना गुंडे यांनी जाहीर केले.