पुणे : महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा विराजमान होत, विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनी हॅट्ट्रिक केली. शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बंडू गायकवाड यांचा दहा विरूध्द सहा मतांनी पराभव केला़
स्थायी समितीचा सदस्य पदाचा कालावधी संपल्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी नव्याने नियुक्त झालेल्या सदस्यांमध्ये भाजपने रासने यांची फेरनिवड केली होती़ महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने रासने यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड होणार हे निश्चित झाले होते़ आज निवडणूक प्रक्रिया पार पडून त्यांच्या अध्यक्षपदाच्या हॅट्ट्रिकवर शिक्कामोर्तब झाले़ स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या या निवडणुकीकरिता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
रासने हे महापालिकेत चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. २०१७ मध्ये महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे हे कॅन्टोंन्मेंट विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यामुळे अध्यक्षपदाची मुदत संपण्याअगोदर तीन महिने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता़ या वेळी रासने यांना प्रथम स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची संधी देण्यात आली़ मार्च २०२० मध्ये स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने रासने यांनाच पुन्हा उमेदवारी देत अध्यक्षपदी संधी दिली गेली होती़
----------------
सर्व पक्षीय सदस्यांना बरोबर घेऊन काम करणार
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर रासने यांनी पत्रकारांशी बोलताना, येत्या वर्षभरात सर्वपक्षीय नगरसेवकांना व प्रशासनाला सोबत घेऊन सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले़ पुणे शहरामध्ये खूप पोटेंशियल असून त्या माध्यमातून, पुढील काही वर्षात पुण्याचा जगातील सर्वात चांगल्या दहा शहरांच्या पंक्तीत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले़
---------------------------------
फोटो तन्मयने काढले आहेत़