गेल्या पंधरा दिवसांपासून नदीपात्रातील सर्व बंधारे कोरडे पडले आहेत. कुकडी नदी ही शिरूर, पारनेर, जुन्नर तालुक्यांना वरदान ठरले आहे. नदीवरील सर्व बंधारे कोरडे पडल्यामुळे शेतमाल जळून चालला असून पाणीपुरवठ्याच्या योजना बंद पडल्या आहेत.
शेतकऱ्यांनी कोरोनाच्या संकटात बँकेचे कर्ज घेऊन शेतीमध्ये भांडवलासाठी खर्च केले. मात्र, उन्हाळी पिके, चारा पिके सुकून चालले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. कुकडी नदीवर शेकडो बंधारे असून त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी उपसा सिंचन योजना राबवून शेती व दूध धंद्यात मोठी झेप घेतली आहे. दूध व्यवसायाच्या माध्यमामधून कुकडी काठच्या शेकडो गावांतून लाखो लिटर दुधाचे उत्पादन होते. मात्र नदीला पाणी नसल्यामुळे चारा-पिके सुकून चालले असून, त्यांचा फटका दूध उत्पादनाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणात असलेले पाणी नद्यांना सोडण्याची मागणी शेतकरी वर्गामधून केले जात आहे.
शिरूर तालुक्यातील जांबुत, वडनेर, माळवाडी, मळगंगा कुंड, म्हसे, तर पारनेरमधील गाडीलगाव, म्हसे, गुणोरे, निघोज, वडनेर, शिरापूर, चोंभुत गावांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
--
फोटो क्रमांक : ११ टाकळी हाजी कुकडी पडली कोरडी
फोटो ओळी : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील कुकडी नदीवरील जगप्रसिद्ध रांजणखळगे पाणी नसल्याने उघडे पडले आहेत.