खोडद : जुन्नर तालुक्यातील अनेक ठिकाणी झाडांवर सुगरण पक्ष्यांचं घरटं विणताना चित्र पाहायला मिळत आहे.
सुगरण हा साधारणपणे चिमणीच्या आकाराचा छोटा पक्षी आहे. सुगरणीच डोकं हळदीच्या पिवळ्या रंगासारखे असते, समोरून पाहिलं तर छातीपर्यंत पिवळा रंग ठळक असतो आणि तिथून खाली तो पांढरा होत जातो. सुगरणीला काटेरी झुडपांवर राहायला आवडते. विशेषतः बाभूळीच्या झाडावर, त्यातून घराट्याचं आणि पिलांचं संरक्षण कारण सोपं जातं, अशी बाभळीची झाड पाण्याच्या जवळ असली तर हमखास इथे सुगरणी घरट बनवतात. विहिरीच्या काठांवर असणाऱ्या झाडांच्या ज्या फांद्या विहिरींमध्ये डोकावतात त्या फांद्यांना सुगरण आपले घरटे करते, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जर साप सुगरण पक्षाची अंडी खाण्याच्या उद्देशाने जर त्या फांदीवरून घरट्यात येण्याचा प्रयत्न करू लागला तर त्याच्या वजनाने ती पातळ फांदी वाकली जाईल व साप विहिरीतील पाण्यात किवा काटेरी झुडपात पडेल अशा प्रकारची या घरट्याच्या बांधणीची रचना असते. सापाला घरट्यात सहजपणे जाता येऊ नये म्हणून घरट्याचे तोंड किंवा प्रवेशद्वार खालच्या बाजूने असते. पावसाळ्याचा सुरवातीला मादी या नव्याने बांधलेल्या घरट्यामध्ये अंडी घालते. दरवर्षी नवीन घरट बांधल जातं. मार्च ते जून हा सुगरण पक्ष्यांचा खोपे बनविण्याचा हंगाम असल्याने सध्या ग्रामीण भागात विहिरी, ओढे, नाले, नदी व बाभळींच्या झाडांवर सुगरण पक्षी घरटी विणताना दिसत आहेत.
"सुगरण हा अनेक माद्यांचा स्वीकार करणारा चाणाक्ष पक्षी आहे. खोपा तयार करण्याची त्याची स्वतंत्र शैली आहे. वर्षा ऋतूच्या अगमनाबरोबर नर मोठ्या प्रमाणात रानात दिसू लागतो. सतेज पंख व छातीवरील सोनेरी रंगामुळे ते खूपच सुंदर दिसतात. घरटी उंच झाडांच्या शेंड्यावर, पाण्यावर डोकवणऱ्या बाभळीच्या झाडावर असतात. झाडाच्या फांदीला गाठ मारली की तो त्यांच्या घरट्याचा पाया होतो." - यश मस्करे, पक्षी व निसर्ग अभ्यासक
मढ, ता. जुन्नर ================================"सर्वच पक्ष्यांमध्ये सुंदर घर कुणाचं तर नक्कीच सुगरणीचं नाव पहिलं येतं. घरट्यामध्ये जाण्यासाठी खालच्या बाजूने नळीसारखी विशेष रचना असते. एका घरट्यासाठी सुगरणीच्या नराला साधारणपणे ५०० फेऱ्या माराव्या लागतात. घरटे बांधण्यासाठी मादी सुगरण मदत करत नाही, त्यामुळे घरट बांधण्याची जबाबदारी नराकडे असते. गंमत म्हणजे जो नर चांगले घरटे बनवेल त्या घरट्याकडे आणि पर्यायाने नराकडे जास्त माद्या आकर्षित होतात." -. राजकुमार डोंगरे, वनस्पती व पर्यावरण अभ्यासक
खोडद, ता. जुन्नर
कॅप्शन - खोडदजवळील किल्ले नारायणगडाच्या परिसरात एका बाभळीच्या झाडाला खोपा करण्यात मग्न असलेला सुगरण पक्षी.