निमगाव केतकी : निमगांव केतकी-कचरवाडी (ता.इंदापूर) गावात लांडग्याच्या कळपाने अचानक येथील शेळ्यांवर हल्ला चढवत शेळ्यांची ९ लहान पिल्ले जागीच ठार केली. तसेच, तर ९ पिल्ले पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि १८) मध्यरात्री घडला.
या मध्ये माणिक दत्तु कचरे या मेंढपाळाचे सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच सरपंच कुंडलिक कचरे यांनी वन विभागाला कळवले. इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या सुचनेनुसार इंदापूरचे वनपाल विठ्ठल खारतोडे, बिजवडीचे वनरंक्षक डी. बी. गवळी व पशुवैद्यक डॉ. एम.पी. काझडे, गावकामगार तलाठी गोरक्षनाथ इंगळे यांनी सर्व घटनेचा पंचानामा केला. यावेळी पुणे जिल्हा सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष अॅड. श्रीकांत करे, गावचे पोलीस पाटील महादेव बरळ, धनाजी कचरे, शशिकांत मिसाळ, भीमराव कचरे, लहु कचरे, लक्ष्मण कचरे, संतोष जाधव आदी उपस्थित होते.
सरपंच कचरे यांनी वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना ही माहिती दिली आहे. भरणे यांनी याची दखल घेत कचरे यांना तातडीने मदत देण्याची ग्वाही दिली.
कचरवाडीत लांडग्याच्या कळपाने हल्ला केलेल्या शेळ्यांच्या पिल्लांचा पंचानामा करण्यात आला.
१८०६२०२१-बारामती-१९