पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) सुरू केलेल्या हेरिटेज वॉक (heritage walk in sppu) उपक्रमाला गुरुवारी पुन्हा सुरुवात झाली. कोरोना नियमांचे पालन करून नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या उपक्रमास मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे कोरोनामुळे काही काळ कमी झालेली विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा अनुभवायला मिळाली.
सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र- कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी दत्तो पोतदार वामन संकुल येथून हेरिटेज वॉक पुन्हा सुरू झाला.
यावेळी इतिहास विभागातील श्रद्धा कुंभोजकर, प्रा. बाबासाहेब दूधभाते, मानवशास्त्र विभागप्रमुख डॉ. शंतनू ओझरकर तसेच संशोधकांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठातील ऐतिहासिक मुख्य इमारतीने यावर्षी १५१ वर्षे पूर्ण केली आहेत. या इमारतीत असणाऱ्या दुर्मीळ चित्रांचा वारसादेखील विद्यापीठाने जतन केला आहे.
अठराव्या शतकात जेम्स वेल्स या चित्रकाराने महादजी शिंदे, नाना फडणवीस आणि सवाई माधवराव यांचे चित्र काढले होते. हे चित्र यांच्या त्यावर योग्य रासायनिक प्रक्रिया करून पुन्हा मूळ स्वरूपात आणले असून मुख्य इमारतीत पुन्हा प्रदर्शित केले आहे. दरम्यान, प्रत्येक महिन्यातून दोनदा ठरावीक वेळेत नागरिकांसाठी हा "हेरिटेज वॉक" घेण्यात येणार असून याची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तसेच प्रसिद्धीपत्रकाद्वारे यावेळी इतिहास विभागातील प्रा. कळविण्यात येईल.