ठळक मुद्देहरियाणा येथील एका टीममार्फत करण्यात आला प्रयोग
श्रीकिशन काळे
पुणे : कोणतीही इमारत बांधण्याचा विचार झाला की सर्वात प्रथम विचार होतो तो पायाचा... पाया शिवाय उभी राहिलेली इमारती फक्त वेरुळच्या लेण्यामधील कैैलास मंदिराचा.. परंतु, मानव जातीला एक वरदान मिळाले आहे ते म्हणजे कल्पना शक्तीचे त्याच्या जोरावर तो नाही नाही ते अचाट प्रयोग करुन पाहतो.. असाच एक भन्नाट प्रयोग पुण्यातील घोरपडी येथील बी. टी. कवडे रस्ता येथे करण्यात आला आहे . तिथे चक्क सुमारे दोन हजार फुटांचे घर वर उचलून त्याची उंची वाढविण्याची किमया साधण्यात आली आहे. त्यासाठी हे घर जमिनीपासून कापून वर घेण्यात आले आहे. त्यामुळे परिसरामध्ये त्याबाबत चर्चा सुरू आहे. आपली कार पंक्चर झाली तर आपण ती वर उचलण्यासाठी त्याला जॅक लावतो. तशाच पध्दतीने घर खालून कापण्यात आले आणि त्याच्या खाली शेकडो जॅक लावण्यात आले आहेत. त्यामुळे या घराची उंची वाढली आहे. अनेक वर्षांपूर्वी हे घर बांधण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या आजुबाजूला अनेक विकासकामे झाली. रस्ते बांधले गेले. त्यामुळे आजुबाजूची घरे आणि रस्ते उंच झाली. परंतु, हे घर जुने असल्यामुळे ते खालीच राहिले. त्यामुळे ते ठेंगणे दिसू लागले. रस्ता उंच आणि हे घर खाली झाल्याने रस्त्यावरील पाणीही या घरात येऊ लागले. आपलं घर खाली आणि रस्ता उंच हे त्या घरमालकाला रूचले नाही. त्यामुळे त्यांनी घरच उचलून त्याची उंची वाढविण्याचा चंग बांधला.सुमारे २००० स्क्वेअर फुटांच्या घराचा पाया कापून शेकडो जॅक लावून तो उचलला आहे. आणि घराच्या खालील जागेत नव्याने विटा रचण्यात आल्या आहेत. हरियाणा येथील एका टीमने हे सगळे काम केले आहे. अशा प्रकारे घर उंच करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात तरी पहिल्यांदाच होत असल्याचे बोलले जात आहे , अशी माहिती विजय अडागळे यांनी दिली.