अरे, तुझा मास्क कुठंय, उचलायला सांगू का तुला पोलिसांना; बारामतीत अजित पवारांनी घेतली कॅमेरामनची 'शाळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 12:05 PM2021-08-28T12:05:20+5:302021-08-28T12:10:44+5:30
बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान अजितदादांच्या त्याच रोखठोक आणि शिस्तप्रिय स्वभावाचा अनुभव एका वृत्त वाहिनीच्या कॅमेरामनला आला.
बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. आणि कोरोना काळात ते पहिल्या दिवसापासून नियमांचे पालन करण्यासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळाले आहे. आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चारचौघात सुनावताना देखील ते मागेपुढे पाहत नाही. आज पुन्हा एकदा बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान अजितदादांच्या त्याच रोखठोक आणि शिस्तप्रिय स्वभावाचा अनुभव एका वृत्त वाहिनीच्या कॅमेरामनला आला.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे भाषण म्हणजे अस्सल ग्रामीण भाषेतील विनोदाची पाखरण असते. भाषणात बोलता-बोलता दादा अनेकांची फिरकी घेतात. त्यामुळे साहजिकच विनोद निर्माण होतो. तर कधी कधी मिश्किलपणे ते एखाद्याची कानउघाडणी देखील करतात. सहकार व पणन मंडळाच्या बारामती येथील शनिवारी (दि. २८) कार्यक्रमात असाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मिश्किलपणा दिसून आला.
कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत अजूनही काळजी घेणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. लवकरात लवकर लसीकरण व्हावे यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूूचनांचे पालन करा, असे सांगितले. नेमके याच वेळी एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनचा मास्क हनुवटीवर असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. ‘अरे मी काय सांगतो. तुझा मास्क कुठाय. तुझ्यामुळे शेजारी असणाऱ्याला कोरोना व्हायचा. उचलायला सांगू का पोलिसांना’ अशा शब्दात कानउघाडणी केली. यावर कार्यक्रमस्थळी हशा देखील पिकला.
------
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखाना देशात अव्वल ठरला आहे. त्यांच्याकडे सध्या २० लाख साखर पोत्यांचा साठा आहे. सध्या साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे विचार करा या कारखान्याला किती फायदा होणार आहे. आपल्या तिन्ही साखर कारखान्याचे चेअरमन यांनी पहा जरा कारखान्याचे काम कशा पद्धतीने केले जाते. सहकारमंत्र्यांचा कारखाना एकखांबी आहे. ते म्हणतील ती पूर्व दिशा असते. कारखान्याची निवडणूक सुद्धा बिनविरोध केली जाते. ते सांगतील तो संचालक होतो. मात्र, आपल्याकडे माळेगाव व सोमेश्वरमध्ये सगळा गोंधळच आहे. माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे तर अगदी मेटाकुटीला आले आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व छत्रपती अध्यक्ष प्रशांत काटे यांना कानपिचक्या दिल्या. यावर मात्र कार्यक्रमस्थळी चांगलीच खसखस पिकली.
-------
सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे विधानसभेचे तिकीट एका निवडणुकीमध्ये पक्षाने कापले. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी बंडखोरी केली. आम्ही सुद्धा त्यांना ‘करा’ असे म्हणालो. त्यानंतर बाळासाहेब ४३ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. विजयी झाले तरी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बाळासाहेब दैवत मानत असल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही. यावर देखील जोरदार हशा पिकला.
------------------------------