- पंढरीनाथ नामुगडेपुणे : कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सरकार, प्रशासन , आरोग्य विभाग आणि समाजसेवी संस्था अतोनात मेहनत करत आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळा असे वारंवार सातत्याने सांगण्यात येत आहे. आणि हाच एकमेव उपाय आहे ज्याद्वारे कोरोनाला वाढता प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो. पण सांगितलेले लगेच ऐकेल ती जनता कसली... हेच चित्र मंगळवारी सकाळी पुणे- सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती (ता.हवेली) परिसरात पाहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळा या आवाहनाला पायदळी तुडवत तिथे भरणाऱ्या बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी एकत्र येतात. यावेळी मोठ्या संख्येने ट्रक, टेम्पो, रिक्षांची याठिकाणी गर्दी होत आहे.पुणे- सोलापूर महामार्गावर बेकायदेशीरपणे व्यापाऱ्यांनी विक्री सुरू ठेऊन नियम धाब्यावर बसवले आहेत.या ठिकाणी असलेले विक्रेते मास्क, ग्लोज न लावता बिनधास्त परिसरात वावरत असल्याचे दिसून येते. पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती,लोणी काळभोर ह्या गावात भाजीपाला जास्त प्रमाणात पिकवला जातो.त्यामुळे येथील स्थानिक शेतकरी आपला माल याठिकाणी विकण्यास घेऊन येत आहेत. आणि या गावांपासून पुणे शहर जवळ असल्याने शहरातील भाजीपाला व्यापारी याठिकाणी खरेदीसाठी येत आहेत.मात्र सर्वत्र कोरोनाची प्रचंड दहशत असताना आणि सुरक्षित अंतर राखून खरेदी - विक्रीचे व्यवहार करण्याची काळजी घेतली जात असताना या भागात भाजी खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाल्याने एकच चिंता व्यक्त होत आहे. सुदैवाने पूर्व हवेली परिसरात कोरोनाच्या रुग्ण आढळलेला नाही ही जमेची बाजू असताना सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे.परंतु व्यापाऱ्यांकडून जराही पालन होताना दिसत नसल्याचे चित्र दिसत आहे.कदमवाकवस्ती ग्रामपंचायतच्या वतीने (दि.४ ते ६एप्रिल) या तीन दिवसाकरिता संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्यात आलेले होते.हा लॉक डाऊन सुरू करण्याअगोदर सर्व नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेऊन ठेवा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते.लॉक डाऊनच्या दरम्यान कोणीही किराणा,मेडिकल व इतर जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी सुद्धा बाहेर येऊ नये असे सांगण्यात आले होते.परंतु, आज ग्रामपंचायतीच्या वतीने केलेल्या तीन दिवसांचा लॉकडाऊन संपल्यावर शेतकरी व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगला फाटा देत पुणे सोलापूर महामार्गावरील टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी करत बाजार भरवल्याने तीन दिवसांच्या लॉकडाऊनवर पाणी फिरल्याची चर्चा होत आहे. शेतातला माल विक्रीसाठी तयार असून तो विकला नाही तर शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे.शासनाने आमच्यासाठी काही तरी नियमावली काढावी. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.असे मत शेतकऱ्यांनी यावेळी मांडले.
अरेच्चा ! तुम्हांला वाटेल ‘येथे ’लॉकडाऊन नाही; पण आहे फक्त ' या 'नागरिकांना तो मान्य नाही....
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 2:20 PM
पुणे- सोलापूर महामार्गावर बेकायदेशीरपणे व्यापाऱ्यांनी विक्री सुरू ठेऊन नियम धाब्यावर बसवले आहेत.
ठळक मुद्देया गावांपासून पुणे शहर जवळ असल्याने शहरातील भाजीपाला व्यापारी याठिकाणी खरेदीसाठी येतात