आळंदी : ब्रिटिशकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या आळंदी नगर परिषद इमारतीने आपल्या वयाचा १०४ वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. आजच्या प्रगत युगात ती ‘हायटेक’ व्हावी, आधुनिक दिसावी, या दृष्टीने नव्या इमारतीचा अतिशय सुंदर आराखडा तयार करण्यात आला आहे. ब्रिटिशांच्या कारकिर्दीत १८६९ मध्ये स्थापन झालेल्या नगर परिषद इमारतीला तब्बल ४२ वर्षे वाट पाहावी लागली. त्यानंतर १९११ मध्ये ही इमारत बांधण्यात आली. तत्कालीन नगराध्यक्ष सर्जेराव तानाजी घुंडरे यांच्या १९५७ ते १९६१ या कालावधीत प्रथमच या इमारतीचे नूतनीकरण व आॅईलपेन्ट देऊन इमारतीला वेगळेपण देण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यानंतर आहे तीच अपुरी जागा, कर्मचारी जिथे काम करतात तिथेच न. प.चे सभागृह. याच सभागृहाने १९२० पासून अमलात आलेल्या म्युनिसिपल कायद्यानुसार प्रथम नगराध्यक्ष पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्यासह महादेव तुकाराम वाघमारे, सर्जेराव तानाजी घुंडरे, पंढरीनाथ रामदास कबीरबुवा, रा. तु. रानवडे, द. बा. कुऱ्हाडे, ब. रा. रानवडे, सु. न. गांधी, ब. स. घुंडरे, सु. ध. वडगावकर, शारदा वडगावकर, मंदाताई वाघमारे, बबनराव कुऱ्हाडे, ना. भि. गरुड, वि. मो. कुऱ्हाडे, सचिन पाचुंदे, राहुल चिताळकर, वर्षा कोद्रे यांनी व नगरसेवकांनी आळंदी विकास प्रश्नावर चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. सद्य:स्थितीत नगराध्यक्ष रोहिदास तापकीर व त्यांचे समस्त नगरसेवक सहकारी याच सभागृहातून आपले कामकाज चालवत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या, आळंदीत येणारे यात्रेकरू, भाविक व वारकऱ्यांची संख्या, लग्नसराईत होणारी प्रचंड गर्दी या एकूणच वाढत्या लोकसंख्येमुळे येथील दिवसेंदिवस वाढणाऱ्या समस्या, रोज निर्माण होणारे प्रश्न, पुरवाव्या लागणाऱ्या सार्वजनिक सुविधा यात वाट झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरही याचा ताण पडतो.
आळंदी नगर परिषदेला मिळणार हायटेक इमारत
By admin | Published: August 04, 2015 3:48 AM