पुणे : सर्दी, तापाचे रुग्ण वाढत असल्याने घरच्या घरी कोरोना टेस्ट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मेडिकलमध्ये यासाठी २५० रुपयांत किट मिळते. होम टेस्टिंग किटची मागणी वाढल्याने आणि अनेक रुग्ण टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर माहिती लपवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे किट घेऊन जाणाऱ्या ग्राहकांचे मोबाईल क्रमांक औषध विक्रेत्यांनी नोंदवून घ्यावेत आणि शासकीय अधिकाऱ्यांकडे द्यावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
लक्षणे दिसत असल्यास घरच्या घरी अँटिजन टेस्ट करता यावी, यासाठी मेडिकल स्टोअर्समध्ये होम टेस्टिंग किट उपलब्ध आहेत. किटच्या माध्यमातून रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह, हे १५ मिनिटांत कळू शकते. तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांचे प्रमाण खूप वाढले आहे. अनेक रुग्ण घरी टेस्ट केल्यावर त्याची माहिती लपवत आहेत. टेस्टिंग किट्सवर राज्य सरकारचे नियंत्रण असावे. टेस्टचे निष्कर्ष ‘क्यू आर कोड’ स्कॅनिंगद्वारे कळावेत, यासाठी औषध विक्रेत्याकडून नागरिकांचा मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक घेतला जावा आणि तो शासनाकडे पोहोचावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशननेही सरकारकडे केली आहे.
किट खरेदी करणाऱ्या रुग्णांची संपूर्ण माहिती, नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, विक्री केलेल्या किटसचा तपशील इत्यादीचे रेकॉर्ड ठेवावे. रेकॉर्डची तपासणी औषध निरीक्षकांमार्फत करण्यात येईल. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना रेकॉर्ड त्वरित उपलब्ध करून द्यावे, असे आदेश अन्न व औषध प्रशासनातर्फे औषध विक्रेत्यांना दिले आहेत. किट खरेदी करणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करावे, अशाही सूचना दिल्या आहेत.
मागणी वाढली
''होम टेस्टिंग किट २५०-३०० रुपयांत औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. किट खरेदी करण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज भासत नाही. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यास अथवा सौम्य लक्षणे दिसत असल्यास नागरिक किट खरेदी करत आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये किटची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत, असे आवाहन नागरिकांना करत आहोत असे औषध विक्रेते सचिन शिंदे यांनी सांगितले.''
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास घाबरून न जाता फॅमिली डॉक्टर अथवा जनरल फिजिशियनशी संपर्क साधून, लक्षणांबाबत चर्चा करून योग्य औषधोपचार करून घ्यावेत. घरातील सदस्यांपासून स्वतःला विलग करावे. क्यूआर कोड स्कॅन करून निष्कर्ष आयसीएमआरच्या पोर्टलवर नोंदवावेत. टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर टेस्ट करून घ्यावी.