पुणे : कर्जासाठी तारण ठेवलेली स्थावर मालमत्ता ताब्यात घेऊ नये, यासाठी बनावट स्थगिती आदेश तयार करुन उच्च न्यायालयाची फसवणूक केलेल्या फरार झालेल्या दोघांना दरोडा व वाहन चोरी पथकाने अटक केली.
स्टँप व्हेंडर जयश्री वसंत पारख (वय ५६, रा. महर्षीनगर, मार्केटयार्ड) आणि जीवन नेमीचंद बेताळा (वय ४६, रा. सॅलेसबरी पार्क, मार्केटयार्ड) अशी त्यांची नावे आहेत.
वसंत पारख, विपुल पारख व जयश्री पारख यांनी टाटा फायनान्स करुन २ कोटी ३ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जफेड न केल्याने फायनान्स कंपनीने तारण म्हणून दिलेली स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली होती. ही मालमत्ता ताब्यात घेऊ नये, यासाठी ॲड. आशुतोष रानडे याने आरोपी योगेश पुरंदरे याच्या मदतीने उच्च न्यायालयाने स्थगिती असल्याचे बनावट आदेश तयार केले. आरोपींनी त्याचा वापर करुन कंपनीचे जप्तीस स्थगिती मिळवून उच्च न्यायालयाची फसवणूक केली होती. आझाद मैदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ते फरार होते. दरोडा व वाहनचोरी पथकाचे सहायक निरीक्षक जुबेर मुजावर यांना दोघे आरोपी घरी आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण व त्यांच्या पथकाने आरोपींच्या घरी जाऊन त्यांना ताब्यात घेतले व पुढील कारवाईसाठी आझाद मैदान पोलिसांच्या ताब्यात दिले.