३ वर्षे कारागृहात असलेल्या अनिल भोसलेंना उच्च न्यायालयाकडून जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 13:07 IST2024-08-22T13:06:41+5:302024-08-22T13:07:13+5:30
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सुमारे ४३६ कोटी ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर भोसलेंना ३ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती

३ वर्षे कारागृहात असलेल्या अनिल भोसलेंना उच्च न्यायालयाकडून जामीन
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहाराप्रकरणी गेली तीन वर्षे कारागृहात असलेले माजी आमदार अनिल भोसले यांना अटी शर्तींवर उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला.
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत सुमारे ४३६ कोटी ४४ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या प्रकरणी भोसले यांना तीन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. बँकेतील व्यवस्थापक, भोसले, बांदल यांच्यासह सात जणांविरुद्ध पोलिसांनी ६ सप्टेंबर २०२१ रोजी आठ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये भोसले, बांदल, तसेच अन्य आरोपी कारागृहात होते. बांदल यांची काही महिन्यांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली. भोसले यांचा जामीन सत्र न्यायालयाने चार वेळा फेटाळला होता. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
दरम्यान, ईडीने मंगळवारी (दि. २०) बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानांवर छापे टाकले. त्यांची १६ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना रात्री अटक करून मुंबईला नेले. त्यांच्या चौकशीनंतर या पथकाकडून भोसले यांनाही चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, त्यामुळे भोसले अडचणीत सापडण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.