पुणे : पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात नऊ वर्षांपासून कारागृहात असलेल्या आरोपी पतीला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला.
गोकुळ प्रताप चव्हाण, असे जामीन मंजूर झालेल्याचे नाव आहे. पत्नी शालूबाई चव्हाण, असे मयत पत्नीचे नाव आहे. आरोपीवर मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. मुंढवा गावामधील एकाच्या विहिरीत महिलेचा मृतदेह तरंगत होता. विहीर मालकाने पोलिस स्टेशनला कळवले. कोणीतरी तिचा निर्घृण खून केला होता. पुरावा नष्ट करण्याच्या मृतदेहाच्या डोक्याचा भाग तिथे ठेवला नाही. कालांतराने शोध घेतला असता तिच्या पतीने हा खून केल्याची माहिती मिळाली.
आरोपीची केस पुण्याच्या सत्र न्यायालयात सुरू होती. २०१९ पासून या केसमध्ये कोणताही साक्षीदार तपासला नव्हता. त्यामुळे आरोपीने विलंबानुसार जामीन अर्ज सत्र न्यायालयामध्ये दाखल केला होता. मात्र, आरोपीचा अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपीच्या वतीने अॅड. नीलेश वाघमोडे, अॅड. अमित ईचम यांनी काम पाहिले.
आरोपी २०१५ पासून कारागृहात आहे आणि २०१९ पासून त्याचा कोणताही साक्षीदार तपासला गेलेला नाही. त्यानंतर साक्षीदार तपासण्याऐवजी सरकारी वकिलाने चार्ज अल्टरेशनचा अर्ज दाखल करून प्रकरण लांबवण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने चार्ज अल्टरचा अर्ज मंजूर केला. आरोपी नऊ वर्षांपासून जेलमध्ये आहे. त्यामुळे साक्षीदारांची छेडछाड करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असा जोरदार युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला. आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीचा अर्ज मंजूर करण्यात आला.