वारजे (पुणे) : भारती विद्यापीठ, सिंहगड, वारजे भागात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूममधून महागडे लॅपटॉप, चार्जर, कॅमेरे चोरणाऱ्या उच्चशिक्षीत चोरट्याला वारजे पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचे १२ लॅपटॉप, ७ चार्जर, कॅमेरा, दोन दुचाकी असा ६ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुण्यातील वारजे, सिंहगड, भारती विद्यापीठसह रायगड जिल्ह्यातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
अर्जुन तुकाराम झाडे ( वय २२, रा. कर्वेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. झाडे हा उच्चशिक्षित असून त्याने कृषीविषयक अभ्यासक्रमाची पदवी घेतली आहे. मौजमजेसाठी त्याने चोरीचे गुन्हे केल्याचे समोर आले आहे. मागील काही दिवसांत वारजे भागात विद्यार्थ्यांच्या रूममधून लॅपटॉप चोरी जाण्याचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास वारजे पोलिसांकडून सुरू होता. गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपास केला. त्यावरून लॅपटॉप चोरीचे गुन्हे झाडे याने केल्याचा संशय पोलिसांना आला.
त्यानूसार सापळा रचून झाडेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या रूममधील लॅपटॉपबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी लॅपटॉप पाहणी केली असता चोरी गेलेले लॅपटॉप त्याच्याकडे आढळले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने शहरातील सिंहगड, वारजे तसेच भारती विद्यापीठ भागात लॅपटॉप तसेच पूर्वी रायगड येथे शिक्षणासाठी असताना महाड व माणगाव येथून दोन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यानूसार पोलिसांनी झाडे याला अटक केली.
सहायक पोलीस आयुक्त भीमराव टेळे, वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर, गुन्हे निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, रामेश्वर पार्वे, अंमलदार प्रदीप शेलार, हनुमंत मासाळ, अमोल राऊत, गोविंद फड, विक्रम खिलारी, विजय भुरूक, बंटी मोरे, श्रीकांत भांगरे, अजय कामठे, अमोल सुतकर, राहुल हंडाळ, नंदकुमार चव्हाण यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.
गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी सुमारे ६ महिन्यांपूर्वी वारजेचा पदभार स्वीकारला. या सहा महिन्यात वारजे ठाण्याचा गुन्हे उघडकीस येण्याचा प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी ते कार्यरत असलेल्या उत्तमनगर पोलिस ठाण्यातदेखील गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण चांगले होते .