दौंड / यवत : दौंड तालुक्यात गेल्या दोन दिवसांत अतिवृष्टी झाली असून ६१७ मि.मी पाऊस पडला. यवत व खामगाव येथे आलेल्या पुरात दोघे जण वाहून गेले. विठ्ठल काळूराम बोंडे (वय २८, रा. माळशिरस, ता. पुरंदर) व सिकंदर ऊर्फ राजेंद्र्र दत्तू वाघमारे (रा.पिंपळगाव) अशी पुरात वाहून गेलेल्यांची नावे आहेत. दौंड तालुक्यात सरासरी ४५0 मि.मी. पावसाची आवश्यकता आहे. परंतु, पावसाळा सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत तालुक्यात १५९५ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वांत जास्त पाऊस केडगावला, तर सर्वांत कमी पाऊस देऊळगावराजे येथे झाला आहे. रविवारी रात्री दौंड शहरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर मोठा असल्याने रस्त्यावर नदीच्या पाटाप्रमाणे पाणी वाहत होते. तर नेहमीप्रमाणे रेल्वे कुरकुंभ मोरी कंबरे इथपत पाणी साठल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. साधारणत: दीड तासाच्या वर सुरू असलेल्या पावसाने शहरात थैमान घातले होेत. अशाच पद्धतीने तालुक्याच्या ग्रामीण भागात पाऊस जोमाने झाला. यवत परिसरात ओढ्याला तीन दिवसांत रविवारी सायंकाळी दुसऱ्यांदा पूर येऊन मोठे नुकसान झाले. यवतमध्ये भुलेश्वर रस्त्यावर लाटकर वस्तीनजीक असणाऱ्या पुलावर पुराचे मोठे पाणी आले होते. यात पाण्याचा अंदाज न आल्याने या रस्त्यावरून माळशिरसकडे दुचाकी वरुण जाणारा विठ्ठल काळूराम बोंडे हा युवक पाण्यात वाहून गेला. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास काही अंतरावर त्याचा मृतदेह आढळून आला .खामगाव फाटा येथून गाडा-मोडी मार्गे पिंपळगावकडे दुचाकीवरून जाताना दुचाकीसह दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. यातील एक जण जवळच्या झाडाला घट्ट पकडून ठेवल्याने वाचला, तर दुसरा पाण्यात वाहत जाऊन मृत्युमुखी पडला. याबाबतची खबर वाचलेल्या संजय विश्वनाथ कदम (वय २९, रा. पिंपळगाव ) यांनी यवत पोलिसांत दिली आहे. त्यांच्या बरोबर दुचाकीवर असलेला सिकंदर ऊर्फ राजेंद्र्र दत्तू वाघमारे हा पुराच्या पाण्यात वाहत जाऊन मरण पावला. आज सकाळी परिसरातील ग्रामस्थांनी शोध घेतला असता सिकंदर याचा मृतदेह भीमाजी सोपान डुबे यांच्या शेतात मिळून आला.
दौंडमध्ये अतिवृष्टी
By admin | Published: August 26, 2014 5:08 AM