पुणे : खासगी कंपनीतील उच्च अधिकाऱ्याला ऑनलाइन टास्कच्या आमिषाने २५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी दीपा डे हिच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार एका खासगी कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहेत. त्यांच्या मोबाइलवर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. घरातून कामाची संधी अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली होती. चोरट्यांनी त्यांना आमिष दाखवून जाळ्यात ओढले.
सुरुवातीला त्यांना काम देण्यात आले. या कामाचा परतावा त्यांना देण्यात आला. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी २५ लाख ४२ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए. टी. खोबरे तपास करत आहेत.