पुणे : नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर काय कारवाई केली? याबाबत अहवाल सादर करण्याबाबत उच्च शिक्षण संचालकांनी वारंवार सूचना करूनही विद्यापीठांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे उच्च शिक्षणमंत्र्यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला असून, ते स्वत: आता नॅक मूल्यांकनाबाबत विद्यापीठांनी काय कार्यवाही केली, याचा आढावा घेणार आहेत. उच्च शिक्षण विभागाने राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि कुलसचिवांना स्वत: उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठांनी त्यांच्या परीक्षेत्रातील एकदाही नॅक मूल्यांकन आणि पुर्नमूल्यांकन न झालेली अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच सद्य:स्थितीमध्ये निष्क्रिय असेलल्या अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालयांची संलग्नता काढून घेण्यासंदर्भात काय कारवाई केली याचा अहवाल देण्यास सांगितले हाेते. यासंदर्भात दि. २३ मे, ९ ऑगस्ट तसेच दि. ४ सप्टेंबर राेजी स्मरणपत्रे पाठविले हाेते. मात्र, विद्यापीठांनी संलग्नता काढून घेतलेल्या महाविद्यालयांची यादी व इतर माहितीचा अहवाल पाठविला नाही. त्यामुळे आता उच्च व तंत्रशिक्षण मंंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रधान सचिव यासंदर्भात कारवाईचा आढावा घेणार आहेत. संलग्नता काढून घेतलेल्या महाविद्यालयांची यादी व इतर कार्यवाही संबंधित माहितीसह कुलगुरू आणि कुलसचिवांना उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
पुण्यात तीन विद्यापीठांची बैठक-
गाेंडवाना विद्यापीठ, गडचिराेली, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज विद्यापीठ, नागपूर आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती या विद्यापीठांची बैठक आज, शुक्रवारी (दि. ८) पुण्यामध्ये हाेणार आहे.
१२ सप्टेंबरला मंत्रालयात हाेणार बैठक-
मंत्रालयातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री दालनात दि. १२ सप्टेंबर राेजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, पुण्यश्लाेक अहिल्याबाई हाेळकर विद्यापीठ, साेलापूर, शिवाजी विद्यापीठ काेल्हापूर, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर आणि दि. १३ सप्टेंबर राेजी नाथीबाई दामाेदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई, कवयित्री बहिणाबाई चाैधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या कुलगुरू आणि कुलसचिवांची बैठक हाेणार आहे.