राहुल शिंदे
पुणे : राज्याच्या शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) संवर्गातील विद्यार्थ्यांपेक्षा मुस्लिम विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यातही मुस्लिम मुलींपेक्षा मुस्लिम मुले शाळा जास्त प्रमाणात सोडत आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संवर्गनिहाय माहिती दिली आहे. त्यात प्राथमिकपेक्षा उच्च प्राथमिक व माध्यमिक स्तरावरून शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. मुस्लिम कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, रोजगाराच्या अपुऱ्या संधी, कुटुंबाच्या व्यवसायात करावी लागणारी मदत आदी कारणांमुळे मुस्लिम मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जाते. मात्र हीच कारणे एससी, एसटी, ओबीसी संवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू असतानाही या संवर्गातील विद्यार्थ्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण मुस्लिम विद्यार्थ्यांपेक्षा कमी आहे.
चौकट
संवर्गनिहाय शाळा सोडणाऱ्या मुला-मुलींची टक्केवारी (माध्यमिक)
संवर्ग -मुले -मुली -एकूण
खुला -०.८३ -१.३४ -१.०६
एससी -७.६४ -७.४० -७.५२
एसटी -१२.४८ -१२.९९ -१२.७१
ओबीसी -४.१३ -४.८९ -४.४८
मुस्लिम -१६.२७ -१०.७७ -१३.६४
चौकट
“मुस्लिम कुटुंबातील अनेक पालकांना शाश्वत रोजगार नसतो. त्यांची कमाईसुद्धा खूप नसते. त्यामुळे मुस्लिम मुलांमध्ये बालमजुरी व शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. मुस्लिम मुलींच्या तुलनेत मुस्लिम मुले रोजगाराचा शोध लवकर घेतात. परिणामी, मुलींपेक्षा मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण जास्त आहे. यात सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
- शुभा शमिम , शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या
चौकट
“मुस्लिम समाजातील अनेक कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. कुटुंबातील पालकच अशिक्षित असल्याने मुला-मुलींच्या शिक्षणाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. शिक्षण सुरू असतानाच मुले कुटुंबाच्या व्यवसायात मदतीला सुरुवात करतात. त्यामुळे त्यांचे शाळा सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. शासनाने याचा विचार करून एक अभ्यास गट स्थापन करून मुस्लिम मुला-मुलींच्या शिक्षणासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे.”
-अन्वर राजन, सामाजिक कार्यकर्ते