भोर : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेत भोर विधानसभा मतदारसंघात राज्यात सर्वाधिक सुमारे ३७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाने त्यांच्या हिश्श्यातील पहिल्या व अंतिम टप्प्याचे प्रत्येक लाभार्थ्यासाठी एक लाख रुपये निधी मंजूर केला असल्याचे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
पीएसआरडीए योजनेतून जिल्ह्यात ८३६ गावांचा समावेश असून, भोर तालुक्यात ५४, मुळशी, वेल्हे ५३, मुळशी १४५, हवेली ११२, शिरूर ८३, पुरंदर ४०, दौंड ५१, खेड १११ व मावळ १८७ गावांचा समावेश असून, भोर वेल्हे आणि मुळशी तालुक्यांत ६४२८ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले होते. त्यापैकी ६११३ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले असून, राज्य शासनाने त्यांच्या हिश्श्यातील पहिल्या व अंतिम टप्प्याचे प्रत्येक लाभार्थ्याला एक लाख रुपये दिले आहेत. घरकुलाच्या बांधकामासाठी केंद्र सरकार दीड लाख तर राज्य शासन एक लाख असे एकूण २ लाख ५० हजार रुपये अनुदान एका घरकुलासाठी मिळणार असून सदर रकमेतून लाभार्थ्याने ३०० चौरस फुटांचे घर बांधायचे आहे.
आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१९ साली नसरापूर, वेल्हे व मुळशीत पीएसआरडीएचे अधिकारी व सदर गावातील यांचे मेळावे घेऊन त्यातील सूचनांनुसार जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, अमोल नलावडे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, संगीता जेधे, सीमा राऊत यांनी गावपातळीवर लोकांकडून लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करुन घेऊन मंजुरीला पाठवले. त्यानंतर आमदार संग्राम थोपटे यांनी पीएमआरडीएचे प्रकल्प संचालक सुहास दिवसे यांच्याकडे सातत्याने बैठका घेऊन मंत्र्यांकडे पाठपुरावा करुन मंजुरी मिळवली.
दरम्यान, पंतप्रधान घरकुल आवास योजनेत राज्यासाठी १११ कोटी ८९ लाख २० हजार रु निधी मंजूर केला आहे. त्यात पुणे ६१ कोटी ११ लाख, नाशिक, सोलापूर, अकोला व औरंगाबादसाठी ५० कोटी ७८ लाख २० हजार रुपये समावेश आहे. पुणे जिल्हात भोर तालुका १८ कोटी ७५ लाख, वेल्हे तालुका १६ कोटी २९ लाख, मुळशी तालुका ८० लाख रु. अनुदान मंजूर असून, अनुदानाचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आला आहे.
--
कोट
भोर विधानसभा मतदारसंघात सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामपंचायतीत जनजागृती करून लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी पाठवून संबंधित मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा करुन राज्यात भोर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक निधी मंजूर करुन घेतला आहे. त्याचा पहिला हप्ता एक लाख रुपये लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.
- संग्राम थोपटे (आमदार, भोर विधानसभा)