पुणे : जंगली श्वापदाचा अधिवासच मानवाने नष्ट केला. त्यानंतर राहण्याकरिता, लपण्याकरिता पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याने त्या प्राण्यांनी मानवी अधिवासात हस्तक्षेप करायला सुरुवात केली. या सगळ्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. मागील काही महिन्यांपासून ग्रामीण भागात त्याच्या वाढणाऱ्यागंभीर हल्ल्यांनी नागरिक धास्तावले आहेत. मात्र, वनविभागाने पुरेशी काळजी घेऊन काही बिबट्यांना जेरबंद केले. दुसरीकडे विविध कारणांकरिता बिबट्यांची हत्या करण्याचे प्रकार समोर आले आहेत. महाराष्ट्रात मार्चअखेर तब्बल १२ बिबट्यांची हत्या झाली असून डब्ल्यूपीएसआय या संस्थेने केलेल्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे.
प्राणी, वृक्षसंवर्धन याविषयी समाजात जनजागृती करण्याचे काम डब्ल्यूपीएसआय या संस्था करते. या संस्थेने जानेवारी ते मार्च दरम्यान केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील बिबटे त्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. यात उत्तराखंड या राज्यात सर्वाधिक ३६ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. या आकडेवारीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून ३१ बिबटे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडले आहेत. ज्या भागात शिकारीसाठी बंदी आहे अशा ठिकाणी जाऊन तिथे अवैधरित्या शिकार करून मारण्यात आलेल्या बिबट्यांची संख्या १२ आहे. बिबट्या या हिंस्त्र प्राण्यांचा दिवसेंदिवस मानवी परिसरात वाढत चाललेला वावर धोकादायक होत आहे. हे जरी खरे असले तरी दुसरीकडे अनेकांनी कायदा हातात घेऊन त्याचे उल्लंघन केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शासनाने बिबट्या निवारण केंद्र उभारले आहेत. त्यात त्यांची देखभाल केली जाते. ठराविक कालावधीनंतर त्यांना पुन्हा वनधिकाऱ्यांच्या मदतीने जंगलात सोडले जाते. परंतु सध्या बिबट्याची कातडी, दात, नखे, हाडे यांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर हत्या होत असल्याचा निष्कर्ष या अहवालातून पुढे आला आहे.
१ जानेवारी ते ३१ मार्च २०१८ दरम्यानच्या कालावधीत ही आकडेवारी तयार करण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार भारतात एकूण १६२ बिबटे मृत्युमुखी पडले असून यापैकी २६ बिबट्यांची शिकार करून हत्या करण्यात आली. ३४ बिबट्यांची हत्या ही त्यांच्या कातडी, हाडे यांच्याकरिता करण्यात आली असून २१ बिबटे हे वाहन अपघात, रेल्वे अपघातात मारले गेले आहेत. महाराष्ट्रपाठोपाठ इतर राज्यांची आकडेवारी पाहिल्यास त्यात हिमाचल प्रदेश ५, मध्य प्रदेश ३ हे अनुक्रमे दुसºया आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. शिकारीबरोबरच बिबट्याचे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाणदेखील महाराष्ट्रातच असल्याचे समोर आले आहे. विजेचा धक्का, गाडीसोबत झालेल्या अपघातात अशा एकूण ६ बिबट्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघाताचे प्रमाण कर्नाटक ३, पश्चिम बंगाल २, उत्तराखंड २, राजस्थान २, हिमाचल प्रदेश रस्ता अपघातात २ बिबटे मृत्युमुखी पडले आहेत. बिबट्याच्या मृत्यूची कारणे अभ्यासली असता असे दिसून आले की यात एकूण ५१ बिबटे हे मृतावस्थेत सापडले. त्यातील २६ बिबट्यांची हत्या केली गेली. ३४ बिबटे हस्तगत करण्यात आले. ९ बिबटे हे ग्रामस्थांकडून मारण्यात आले. २१ बिबटे हे वाहन अपघातात तर ३ बिबटे हे घटनास्थळी प्रत्यक्ष बचावकार्याचे प्रयत्न सुरू असताना दगावले. ८ बिबटे हे आपापसातील हल्ल्यात मारले गेले असून १ बिबट्या हा विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. * उत्तराखंडमध्ये १२ बिबटे मृतावस्थेत उत्तराखंड या राज्यात तब्बल ३६ बिबट्यांची हत्या करण्यात आली आहे. ही यावर्षीची सर्वाधिक आकडेवारी असून यापाठोपाठ महाराष्ट्राचा क्रमांक आहे. महाराष्ट्रात ३१ बिबटे मारले गेले आहेत. यानंतर राजस्थान १४, उत्तर प्रदेश ११, हिमाचल प्रदेश १०, मध्य प्रदेश १०, कर्नाटक ९ आणि पश्चिम बंगाल व उत्तराखंड या ठिकाणी प्रत्येकी ७ बिबट्यांची हत्या करण्यात आली आहे.
जवळ्पास तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन बिबट्याचा अभ्यास करत होते. ज्या भागात या हत्या झाल्या तेथील स्थानिक प्रशासनाकडे याबाबत नोंदणी झालेली आहे. प्रशासनाला खरं तर आणखी गोपनीय पद्धतीने माहिती पुरविण्याची गरज आहे. त्यांना वेळीच माहिती मिळाल्यास हत्येचे अनेक प्रकार टळतील. नागरिकांना सूचित क रणे, त्यांना सजग राहण्यासाठी मदत करणे, सद्यपरिस्थितीची कल्पना देणे हा संस्थेचा मुख्य हेतू आहे. जागरुक राहण्यासाठी उपयोगी पडेल, अशी कृतीशीलता अंमलात आणणे महत्वाचे आहे. - इथो जोसेफ (वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन सोसायटी आॅफ इंडियाचे कार्यक्रम व्यवस्थापक)