पुणे : जगाच्या पाठीवर माणूस कुठेही गेला तरी महाविद्यालयात पाऊल ठेवतो तेव्हा त्याला आनंदच होतो. फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश केला तेव्हा दहावीचा निकालही लागलेला नव्हता. विज्ञान शाखेला प्रवेश घेतला. सुरुवातीचे काही महिने इंग्रजीत काय शिकविले जात आहे ते कळले नाही... अशी मिश्किल टिप्पणी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली. ‘संस्थेने जे बाळकडू दिले त्यावर मी इथंपर्यंत पोहोचू शकलो. राज्याच्या विधानसभेत सर्वात जास्त व्यक्ती या फर्ग्युसनच्याच असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.‘द फर्ग्युसोनियन्स’ या माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते रामराजे नाईक-निंबाळकर यांना प्रतिष्ठेच्या ‘फगर््युसनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता मेजर जनरल माधुरी कानिटकर, प्राज इंडस्ट्रीचे प्रमोद चौधरी, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना ‘फर्ग्युसन अभिमान’ पुरस्कार देण्यात आला.तसेच फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली आंतरराट्रीय कीर्तीची क्रीडापटू शिवानी स्वरूप इंगळे आणि जागतिक स्तरावरची जिम्नॅस्टिकपटू आकांक्षा बुचडे दोघींना ‘फर्ग्युसन अभिमान’ पुरस्कारातील ‘उगवते तारे’ म्हणून घोषित करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तसेच ‘द फर्ग्युसोनियन्स’चे चेअरमन विजय सावंत आणि अध्यक्ष यशवंत मेहेंदळे उपस्थित होते.शिक्षक, राजकारण, सभापतिपद सर्व काही मिळवले आहे... आता पुढे काय मिळेल हा वादाचा मुद्दा आहे. पण एक आहे मंत्र्यापेक्षा सभापतिपदच जास्त आवडते. ‘बस खाली, जा बाहेर’ एवढच करावे लागत असल्याने लोकशाहीत हे पद एन्जॉय करीत आहे. आता काही मिळविण्याची इच्छा राहिलेली नाही... महाविद्यालयात क्रिकेटचे ‘कॅप्टन’पद भूषविलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकीय फटकेबाजीतून ‘फर्ग्युसोनियन्स’ असल्याची चुणूक दाखवून दिली.खासगीकरण आणि स्वायत्तता ही दोन धोरण देशाच्या शिक्षण व्यवस्थेत राबविली जात आहेत. इतर शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर बदलत्या काळाची पावले ओळखून डेक्कन एज्युकेशन सोसायटीला याचा विचार करावा लागेल, सत्तेत आहे तोपर्यंत ठरवून घ्या... अशी सूचक टिप्पणीही त्यांनी केली.कुलगुरूंचे तुकाराम मुंढे यांना साकडेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेणाºया विद्याथर््यांची संख्या वाढली आहे. १९९१९-१९९२ मध्ये विद्यापीठामधून बससेवा देण्यात आली होती, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होत होता. मात्र ही सेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पीएमपीएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्याकडे चकरा मारत असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
विधानसभेत सर्वात जास्त ‘फर्ग्युसोनियन्स’ - रामराजे नाईक-निंबाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 3:57 AM