पुणे : जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर गिरिप्रेमीच्या जितेंद्र गवारे यांनी १२ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास यशस्वी चढाई करून नवा इतिहास रचला. अवघ्या २५ दिवसांपूर्वी, १६ एप्रिलला त्यांनी गिरिप्रेमीच्या माऊंट अन्नपूर्णा-१ मोहिमेंतर्गत जगातील दहावे उंच शिखर असलेल्या माऊंट अन्नपूर्णा-१ वर देखील यशस्वी चढाई केली होती. महिन्याभरात दोन शिखरांवर चढाई करण्याची अभूतपूर्व कामगिरी त्यांनी केली आहे.
जेष्ठ गिर्यारोहक व गिरिप्रेमीच्या अष्टहजारी मोहिमांचे नेते उमेश झिरपे, एव्हरेस्ट शिखरवीर भूषण हर्षे व तीन अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई करणारे डॉ. सुमित मांदळे यांचे गवारे यांना मार्गदर्शन लाभले. यापूर्वी जितेंद्र यांनी २०१९ साली जगातील तिसरे उंच शिखर असलेल्या माऊंट कांचनजुंगावर तिरंगा फडकविला होता. तसेच २०१९ सालीच माऊंट अमा दब्लम या तांत्रिकदृष्ट्या अतिशय खडतर असलेल्या शिखरावर यशस्वी चढाई करून आपली कौशल्ये सिद्ध केली होती.
एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान पुण्यातून एव्हरेस्ट शिखरवीर गणेश मोरे, गिर्यारोहक विवेक शिवदे तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील भूगोल विभागातील प्राध्यापक डॉ. अविनाश कांदेकर यांनी हवामानाचे अचूक अंदाज जितेंद्रला कळविले. त्यामुळे जितेंद्र व त्यांचा शेर्पा साथीदार पासांग झारोक शेर्पा यांना ८८४८.८६ मीटर इतक्या उंच एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई करता आली.
पुण्यातील वडगाव शेरी येथील रहिवाशी असलेल्या जितेंद्र यांच्या दुहेरी यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
आठ अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई
माऊंट एव्हरेस्ट ही गिरिप्रेमींची नववी अष्टहजारी मोहीम असून याआधी गेल्या महिन्यात माऊंट अन्नपूर्णा-एक, २०१२ साली माऊंट एव्हरेस्ट, २०१३ साली माऊंट ल्होत्से (चौथे उंच शिखर), २०१४ साली माऊंट मकालू (पाचवे उंच शिखर), २०१६ साली माऊंट च्यो ओयू (सहावे उंच शिखर) व माऊंट धौलागिरी (सातवे उंच शिखर), २०१७ साली माऊंट मनास्लू (आठवे उंच शिखर) तर २०१९ मध्ये माऊंट कांचनजुंगा (तिसरे उंच शिखर) अशा आठ अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे.
माऊंट एव्हरेस्ट आव्हानात्मकच
जगातील सर्वात उंच शिखर म्हणून माऊंट एव्हरेस्ट ओळखले जाते. गिर्यारोहकांच्या जगतात या शिखराला विशेष महत्त्व आहे. ८८४८.८६ मीटर उंची असलेले हे शिखर सर करण्यात काही मोजक्या गिर्यारोहकांनाच यश आले आहे. सतत बदलणारे हवामान, चढाईला कठीण सुळके, हिमवादळांचा धोका, आॅक्सिजनचे कमी प्रमाण, हाडे गोठवणारी थंडी यांसारख्या अनेक आव्हानांचा गिर्यारोहकांना सामना करावा लागतो. गिर्यारोहकांना एका मोहिमेला प्रत्येकी २५ हजार डॉलरचा खर्च येतो.