बारामती : येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने उच्चांकी उचल देण्याची परंपरा कायम राखली आहे. सध्या उसाची कमतरता असतानादेखील धाडसाने कारखाना सुरू करण्यात आला. यंदाच्या गळीत हंगामासाठी २७५० रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अन्य सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत हा दर सर्वाधिक आहे. या संदर्भात संचालक मंडळाची बैठक झाली. मागील वर्षी या कारखान्याने २८०० रुपये उच्चांकी दर दिला होता. तीच परंपरा कायम राखत प्रतिकूूल परिस्थितीतदेखील या कारखान्याने २७५० रुपये दर जाहीर केला आहे. एफआरपीपेक्षा ३५४ रुपये जादा दर दिला आहे. राज्यात गेटकेनधारकांना एफआरपीपेक्षा १७५ ते २०० रुपये जादा दर दिला आहे. गेटकेनधारकांना हा अंतिम दर आहे. तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना २७५० रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे. कारखान्याचे ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, कार्यकारी संचालक विजय वाबळे यांच्यासह संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. माळेगावच्या सभासदांना पहिला हप्तादेखील सर्वाधिक देण्यात आला आहे. या संदर्भात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माळेगाव सर्वाधिक दर देणार, असे जाहीर केले होते. त्यामुळे आमच्यावर सभासद, गेटकेनधारकांनी विश्वास ठेवला. काही मंडळींनी चुकीची माहिती देण्याच्या प्रयत्न केला, परंतु त्यांच्या भूलथापांना बळी न पडता माळेगाव कारखान्याला ऊस दिला. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून पहिली उचल राज्यात सर्वाधिक दिली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दराची स्पर्धा करावी..सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची नेतेमंडळी चुकीची माहिती देत आहेत. या नेत्यांनी त्यांच्या ताब्यातील छत्रपती, सोमेश्वरसह अन्य खासगी कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जादा दर देण्यासाठी स्पर्धा करावी, असेही तावरे यांनी जाहीर आव्हान दिले. शेतकऱ्यांना जादा दराचा फायदा कसा होईल, याकडे लक्ष दिल्यास अधिक चांगले होईल, असा टोला त्यांनी मारला.अधिक शेअर्स कापणार नाही... : सध्या शेअर्स कपातीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे. शेतकऱ्यांनी चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता, कारखान्याकडे ८ अ, ७/१२ जमा करावा, त्यांच्या क्षेत्रापेक्षा अधिक शेअर्स कापले जाणार नाहीत, असे तावरे यांनी सांगितले.
माळेगाव कारखान्याचा उच्चांकी २७५० रुपये दर
By admin | Published: January 04, 2017 5:17 AM