पिंपरी : पिंपरी-चिंचचड महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये सुशिक्षित नगरसेवकांची संख्या सर्वाधिक आहे. तर, काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतके अल्पशिक्षित आणि अशिक्षित नगरसेवकही सभागृहात पहायला मिळणार आहेत. बारावी, पदवी, पदव्युत्तर व त्यापुढे व्यावसायिक शिक्षण घेतलेल्यांची संख्या ७७ आहे. तर, पाचवी ते दहावीपर्यंत शिकलेल्या नगरसेवकांची संख्या तब्बल ४९ आहे. यांमध्ये एका अशिक्षित नगरसेवकाचाही समावेश आहे. महापालिका निवडणुकीत १२८ जागांसाठी ७७३ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये अशिक्षित उमेदवारांसह अल्पशिक्षित, दहावी, बारावी यासह पदवी, पदव्युत्तर उमेदवारांनीही आपले नशीब अजमावले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पहिल्यांच उमेदवारांची कुंडली निवडणूक केंद्राबाहेरील फलकांवर लावण्यात आली होती. अनेक उच्चशिक्षित मतदार आवर्जून मतदानापूर्वी हे फलक बारकाईने वाचताना दिसून आले. त्यामुळे अनेक अशिक्षित व अल्पशिक्षित उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे. दुसऱ्या बाजूला उच्चशिक्षतांना मतदारांना सर्वाधिक कौल दिल्याचे दिसत आहे. सध्याच्या नगरसेवकांमध्ये पदवीधर नगरसेवकांची संख्या ३५ असून, उच्च पदवीधर आठ नगरसेवक आहेत. यासह बारावी शिकलेले ३४, तर दहावी पास १४ नगरसेवक आहेत. नववीपर्यंत शिकलेले तब्बल २८ नगरसेवक असून पाचवी शिक्षण झालेले ७ नगरसेवक आहेत. यासह एका अशिक्षित नगरसेवकाचाही समावेश आहे. शिक्षण कमी असले तरी काही जण आपल्या अनुभवाच्या जोरावर चांगल्या प्रकारची कामगिरी करतात. मात्र, काम करण्याच्या जोरावर किती समस्या सोडवू शकतात, याकडेही पाहणे आवश्यक आहे. या गोष्टी लवकर निदर्शनास येतीलच. मतदार राजा मतदान करताना उमेदवाराच्या शिक्षणाचाही विचार करतो. आपला नगरसेवक सुशिक्षित असावा, त्याला प्रश्नांची जाण असावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे राजकीय पक्षांकडूनही उमेदवारी देताना सुशिक्षित उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले. (प्रतिनिधी)नागरिकांनी गुंडापुंडांना बसविले घरीनगरसेवक झाल्यानंतर हजारो नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. मात्र, कोणतेही प्रश्न हातोटीने मांडण्यासाठी विषयांची जाण हवी आणि त्यासाठी किमान शिक्षित असावा, अशी मतदारांची लोकप्रतिनिधींकडून माफक अपेक्षा असते. प्रभागातील समस्या सोडविण्यासह सभागृहातील कामकाजाचीही माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे मतदारांना उच्च शिक्षित उमेदवारांना कौल दिल्याचे दिसून येत आहे.
उच्चशिक्षित कारभारी
By admin | Published: February 26, 2017 3:47 AM