लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम यंदा निवडणुकीतील तरुणाच्या एन्ट्रीमुळे चांगलाच गाजला आहे. पुणे जिल्ह्यात यंदा प्रथमच पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक उच्चशिक्षित तरुण गावाचा ‘व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन’ घेऊनच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने निवडणुकीत अधिक रंगत आली. गावातील प्रस्थापितांच्या विरोधात या तरुण पिढीला किती यश मिळणार हे आज निश्चित होईल.
कोरोना आणि लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका सहा महिने लांबणीवर पडल्या होत्या. परंतु, राज्यात शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने त्वरित राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुका जाहीर केल्या. यात पुणे जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. यात ९५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्याने ६४९ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. या सर्व ग्रामपंचायतींचा निकाल मतमोजणी सोमवार (दि.१८) रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. कोरोनाकाळात लोकांना गावांचे महत्त्व कळाल्याचे अनेक उदाहरणे समोर आली आहेत. याचाच एक परिणाम म्हणून यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित व तरुण पिढी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. यात बहुतेक तरुण राजकारणासाठी राजकारण म्हणून नाही तर गावाच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहेत.
--
गावाच्या विकासासाठी निवडणूक रिंगणात
गेल्या अनेक वर्षांपासून गावात तेच-तेच प्रस्थापित लोक निवडणूक लढवितात व केवळ राजकारणासाठीच राजकारण करतात. परंतु आता गावाच्या विकासासाठी, पुढील काही वर्षांचे व्हीजन घेऊन माझ्यासारखे अनेक तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविल्या तरी ग्रामपंचायतीचा चांगला विकास होऊ शकतो.
- गणेश काळे, उद्योजक, कुरकुंडी ग्रामपंचायत, खेड
--
संपूर्ण पॅनलच तरुणांचे
गेल्या काही वर्षांत गाव बैठकांची बैठकच मोडीत निघत चालली आहे. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांवर पूर्वी गावातील ज्येष्ठांचा असलेला दबाव कमी झाला आहे. गावातील प्रस्थापितांकडून वेगळ वळण दिले जात असून, निवडणुकीत पैसे, दारू वाटले की पुढील पाच वर्ष काही केले नाही तरी चालते, या भ्रमात अधिक असतात. परंतु आता गावागावांतील तरुण गावांच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आमच्या गावात तर आम्ही सर्व तरुणांनी एकत्र येऊन स्वतंत्र पॅनलच उभे केले आहे. केवळ व्हिलेज डेव्हलपमेंटसाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत.
- खंडू काशिद, उच्चशिक्षित, चिंचोली ग्रामपंचायत, जुन्नर
--
तरुणांना गाव विकासाचे व संधीचे महत्त्व पडलेय
आमच्या गावात गेल्या आठ वर्षांपासून निवडणूक बिनविरोध होत आहे. गावांचा संपूर्ण कारभार तरुणांच्या हातात दिला आहे. मी स्वतः गेले दोन-तीन टर्म गावचा सरपंच म्हणून काम पाहत असून, यंदाही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. गेल्या पंधरा वर्षांत गावात प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून, अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. यामुळेच टिकेकरवाडीचे नाव आज राज्य, देशपातळीवर पोहोचले आहे. गेल्या काही वर्षात वित्त आयोगाच्या निधीमुळे व शासनाच्या अनेक योजनामुळे एक आमदार करू शकत नाही एवढी कामे ग्रामपंचायत करू शकते. यामुळेच तरुण ग्रामपंचायत निवडणुकीत उतरत आहेत.
- संतोष टिकेकर, आदर्श सरपंच, टिकेकरवाडी, जुन्नर
--
गावाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी
गेल्या काही वर्षांत केवळ काही सार्वजनिक कार्यक्रम व विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून गावात येऊन काम करत होतो. हे काम करताना गाव कारभा-यांचा गावांच्या विकासाबाबत असलेला वरवरचा दृष्टिकोन पाहिला का वाईट वाटायचे. यामुळेच स्वत: च ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. केवळ गावाच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो.
- दत्ता सुतार, आंबोली, खेड (फाॅक्सवॅगन कंपनीत वरिष्ठ पदावर)