पळसदेव : पुणे-सोलापूर व पुणे-नाशिक महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी रेंगाळलेल्या कामामुळे हे महामार्ग जीवघेणे ठरत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी अनेक ठिकाणी उणिवा राहिला आहेत. अपघातांचे सत्र सुरूच असताना महामार्गावरील पुलाच्या ठिकाणी अपघात घडत आहेत. महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर नवीन पुलांची बांधणी झाली. तसेच, हे पूल प्रशस्त झाले. मात्र, जुने पूल (पूर्वीच्या महामार्गावरील) आहे त्या अवस्थेत तसेच आहेत. जुने पूल अरुंद असल्याने त्या ठिकाणी अपघात घडत आहेत. दोन वाहने सुसाट जात असताना व पूल अरुंद असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहने पुलावरून खाली कोसळतात. त्यामुळे महामार्गावरील जुन्या पुलांची रुंदी वाढविणे व सिमेंटचे सुरक्षित कठडे बसविणे गरजेचे असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. वाहनांना चढ अथवा उताराचे बंधन राहिलेले नाही. यातून पुढे जाण्याची स्पर्धा वाढल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जसे प्रशस्त झाले, तसे मात्र जुन्या पुलांची रुंदी वाढविणे, संरक्षक कठडे भक्कम करणे, याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. त्यामुळे या पुलांवरून व दोन वाहने जात असताना एकमेकांना वाहने घासणे अथवा नियंत्रण सुटल्यास वाहन पुलावरून खाली कोसळण्याचा धोका संभवतो. पुलाचे कठडे तोडून वाहने खाली पडण्याच्या घटना मागील तीन महिन्यांत भिगवण, भादलवाडी, पळसदेव येथील पुलाच्या ठिकाणी घडल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसते. अपघात झाल्यानंतर पुलाचे कठडे तुटतात. परिणामी पुन्हा अपघाताची शक्यता निर्माण होते. तुटलेले कठडे लवकर बसविले जात नाहीत, कठडे बसविले तर ते लोखंडी बसवून तात्पुरती मलमपट्टी केली जाते.
महामार्ग ठरताहेत जीवघेणे
By admin | Published: April 04, 2015 5:54 AM