पेठ : येथील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन मोजणी प्रक्रिया घोडेगाव उपअधीक्षक भूमी कार्यालयाचे भू-करमापक ए. एस. मुंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या वेळी या भागातील नागरिकांचा, शेतकऱ्यांचा मोजणीला विरोध होऊ नये म्हणून पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, पोलीसबळ वापरून भीती घालून करत असलेल्या मोजणीस आमची हरकत असून, अशी मोजणी आम्हास मान्य नाही. आमच्या हरकती व सुनावणीतील मुद्दे यावर संबंधितांकडून आमचे न्याय्य समाधान होईपर्यंत ही मोजणी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत होते. या वेळी येथील भगवान काळे, बळीराम काळे, संगीता काळे, सबाजी काळे, अरुण गावडे, ज्ञानेश्वर शिंदे, देवराम शिंदे, शिवाजी गावडे यांच्यासह बहुतेक शेतकऱ्यांच्या जमिनींची भूसंपादन कामी मोजणी करण्यात आली. येथील शेतकरी सुदाम काळे व महादेव कातोरे यांनी सांगितले, की आम्ही सदर भूसंपादन ३ (अ) अधिसूचनेप्रमाणे मुदतीत दिलेल्या हरकती व त्यावरील सुनावणीत अनेक मुद्द्यांवर हरकती दिलेल्या आहेत. हरकतींची सुनावणी व त्यावरील निकाल होईपर्यंत मोजणी पुढे ढकलावी, असा अर्ज ११ जुलै २०१४ रोजी घोडेगाव उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयास दिला असताना त्यास उत्तर मिळाले नाही. त्यामुळे या मोजणीस आमची हरकत आहे. प्लॅन, प्रस्ताव, सीमांकन, किती रुंदी क्षेत्र घेणार याची माहिती होऊन मोजणी आहे. (वार्ताहर)
पेठला बंदोबस्तात महामार्गाची मोजणी
By admin | Published: August 28, 2014 4:16 AM