जुन्नर : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे राज्यमार्ग नगरपालिकेकडे हस्तांतरित करून जुन्नर शहरातील बंद पडलेली दारूची दुकाने चालू करण्यासाठी नगरपालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी पक्षाकडून ठराव आणण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी, तसेच शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि. ४) एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा आपला माणूस आपली आघाडीचे गटनेते जमीर कागदी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.उद्या (दि. ४) होणाऱ्या नगरपालिकेच्या सभेत सत्ताधारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांचा अशा प्रकारचा ठराव करण्याचा डाव आहे, असा आरोप गटनेते जमीर कागदी यांनी केला आहे. जुन्नर शहरातून जाणारा राज्यमार्ग तसेच काही रस्ते जे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहेत ते रस्ते नगरपालिकेकडे हस्तांतरित करून राज्यमार्ग रस्त्याच्या ५०० मीटरच्या नियमाला पळवाट करून बंद असलेली दारूची दुकाने चालू करण्याचा विडा काही नगरसेवकांनी उचलला आहे, असा आरोप कागदी यांनी केला आहे. नगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता या रस्त्याची देखभाल करणे नगरपालिकेला जमणार नाही. आमदार शरद सोनवणे यांनी या रस्त्यासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे प्रशासकीय नियोजन प्रगतिपथावर आहे, असे कागदी यांनी सांगितले. जुन्नर शहरातील पाणीपुरवठा यंत्रणामध्ये अनेक त्रुटी असून नागरिकांना वेळेवर पुरेसे पाणी मिळत नाही. प्रशासन पदाधिकाऱ्यांना याबाबत जुमानत नाही, असे कागदी यांनी निवेदनात म्हटले आहे.जुन्नर नारायणगाव हा राज्यमार्ग शहरातून जातो, तर जुन्नर ओतूर मार्ग शहराच्या बाहेरून जातो. शहराजवळून कोणताही राष्ट्रीय मार्ग जात नाही.
राज्यमार्ग हस्तांतरास तीव्र विरोध
By admin | Published: May 04, 2017 1:51 AM