पुणे : बालेवाडी येथे क्लाससाठी आलेल्या तरुणाचे अपहरण करून पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एकाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली असून, तरुणाची कोल्हापूर येथून सहीसलामत सुटका केली. नितीन बाळासाहेब शिंदे (वय ४०, रा. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या तरुणाच्या वडिलांनी (वय ६६, रा. माण, ता. मुळशी) या संदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मूळचे बीडचे आहेत. ते माण येथे कामाला आहेत. त्यांचा २६ वर्षाय मुलगा सोमवार ते शुक्रवार काम करून शनिवारी-रविवारी क्लाससाठी पुण्यात बालेवाडी येथे येतो. दि. २२ एप्रिल रोजी शनिवारी सकाळी तो माणहून क्लाससाठी पुण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास तो मुंबई-बंगळुरू महामार्गावर बालेवाडी जकात नाका येथे थांबला होता. त्या वेळी एका गाडीतून आलेल्या तीन ते चार जणांनी त्याला जबरदस्तीने गाडीत बसवून त्याचे अपहरण केले. तसेच, पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. या तरुणाचे वडील मोबाईल वापरत नसल्याने त्याने नातेवाइकांना फोन करून याची माहिती दिली. वडिलांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. चतु:शृंगी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. त्या वेळी खंडणीखोर हे कोल्हापूर येथे असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापूर येथे जाऊन या तरुणाची सुटका केली. नितीन शिंदे याला अटक केली. अपहरण करणाऱ्या इतरांचाही शोध सुरू आहे, असे तपास अधिकारी उपनिरीक्षक ए. आर. शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अपहृत तरुणाची कोल्हापुरात सुटका
By admin | Published: April 26, 2017 4:09 AM