पिंपरी : उत्तर भारतात पावसाने हाहाकार उडविल्याने पर्यटनासाठी गेलेले देशभरातील हजारो पर्यटक हिमाचल प्रदेशात अडकले आहेत. त्यात पुण्यासह पिंपरी-चिंचवडमधील ११ पर्यटकांचा समावेश आहे. याबाबत हिमाचल प्रदेश सरकारशी संपर्क साधण्यात येत असून दळणवळण बंद झाले असले तरी सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, चिंचवड येथील दोन पर्यटकांशी संपर्क होत नसल्याने नातेवाईक चिंतेत आहेत.
'पिंपरी चिंचवडमधील माळुंजकर कुटुंबातील पाच पर्यटक रविवारी मनालीतून कुलूकडे जात होते. पावसामुळे रस्ते बंद असल्याने ते मंडी येथे अडकले. त्यानंतर दोन दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. मंगळवारी तेथील परिस्थिती सुधारल्यावर याच पर्यटकांनी जवळच्या पोलिस ठाण्यातून घरी संपर्क साधला. त्यामुळे ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. हिमाचल सरकारमधील संबंधित अधिकाऱ्यांशी जिल्हा प्रशासन संपर्कात असून सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तेथील दळणवळण ठप्प झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मनोज बानोटे यांनी सांगितले.
या दोन पर्यटकांचा थांगपत्ता नाही...
चिंचवड येथील प्रथमेश साखरे आणि अहमदनगर जिल्ह्यातील कृष्णा भडके हे दोघे चंडीगड येथे आयटी कंपनीत कामास आहेत. शनिवार व रविवारी सुटी असल्याने ते तिथून जवळ असलेल्या शहापूर येथे फिरण्यासाठी गेले. रविवारी दुपारपर्यंत ते संपर्कात होते. त्यानंतर त्यांचा संपर्क झाला नाही. त्यामुळे त्यांनी पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय तसेच आसाम आपत्ती व्यवस्थापन कार्यालयास माहिती दिली आहे, अशी माहिती त्यांचे नातेवाईक कृष्णा नवसुपे यांनी दिली.